कारूळकर प्रतिष्ठानच्या बोरिवली येथील कार्यालयात सोमवारी दोन पाहुण्यांचे आगमन झाले. पूंगनूर जातीच्या छोट्या चणीच्या मैथिली, वैदेही या गाईनी कार्यालयात प्रवेश केला आणि सगळेच त्यांच्या प्रेमात पडले. कारूळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारूळकर आणि त्यांच्या पत्नी तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारूळकर तसेच त्यांचे पुत्र विवान यांनी या दोन गाईंचे औक्षण करून स्वागत केले. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार शोभून दिसत होते.
या गाई प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या जागेत असलेल्या विविध विभागात फेरफटका मारून आल्या. न्यूज डंकाच्या कार्यालयातही त्या आल्या. गाई तिथे वावरल्यामुळे वातावरण पवित्र झाल्याची सगळ्यांची भावना होती. या गाईंच्या या नव्या जातकुळीमुळे सगळ्यांना त्यांचे खूप कौतुक वाटले.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये इतिहास घडला, समान नागरी कायदा लागू झाला!
पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!
चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !
याबाबत प्रशांत कारूळकर म्हणाले की, गाय ही मुळात प्रेमळ असते. आमच्या फार्म हाऊसमध्ये काही गाई आहेत. पण आता या दोन गाई देखील त्यांच्यासोबत राहतील. या गाईंना आम्ही कार्यालयात आणले कारण एरव्ही आपण कुत्रे किंवा मांजरी पाळतो मग आपल्या धर्माचे प्रतीक असलेल्या गाईंना का पाळू नये? यानिमित्ताने आम्हाला या गाई ऑफिसमध्ये आणता आल्या. त्यातून एक संदेश मिळतो की अशा गाई पाळणे शक्य असेल तर जरूर पाळा. त्यांचे दूध केवळ स्वतःपुरते न वापरता आपल्या मित्रमंडळीत त्याचे वाटप करा. आजकाल शुद्ध दूध मिळणे कठीण बनले आहे, त्यामुळे गोपालनातून असे दूध उपलब्ध होऊ शकते. या गाईंमुळे आपल्याला एक मनःशांतीही मिळते, त्याचे वेगळे समाधान असते.
कारूळकर म्हणाले की, गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्याकडून या गाई भेट मिळाल्या आहेत.
या गाई १.५ ते २ फूट एवढ्या असतात. त्या १.५ लिटर दुध रोज देऊ शकतात. आंध्र प्रदेशातील चित्तुर येथे या गाई प्रामुख्याने मिळतात. वृंदावन येथेही या गाई मिळतात.