जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या करण्यापूर्वी एका झाडाखाली बसून जेवण केले होते, अशी माहिती देशातील प्रमुख दहशतवादविरोधी संस्था राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.
२२ एप्रिल रोजी बैसरन या छोट्या डोंगराळ कुरणात पाइन जंगलातून बाहेर आलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गर्दीवर गोळीबार करून २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाची हत्या केली होती. ‘कलमा’ किंवा ‘कलीमाचे पठण करू न शकणाऱ्यांना त्यांनी ठार मारले.
नंतर या तिघांची ओळख फैसल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी पटली. २९ जुलै रोजी श्रीनगरच्या बाहेरील भागात झालेल्या ‘ऑपरेशन महादेव’ दरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी तिघांनाही ठार केले.
विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या १,५९७ पानी आरोपपत्रात पाकिस्तानपर्यंत पोहोचलेल्या खोल कटाचा तपशील दिला आहे. तपास यंत्रणेने हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि हबीबुल्ला मलिक उर्फ साजिद जट्टच्या नेतृत्वाखालील द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) यांना हल्ल्याचे नियोजन, मदत आणि अंमलबजावणी केल्याबद्दल आरोपी ठरवले आहे.
हे ही वाचा:
भोजशाळेत आता नमाज नाही…पोलिस अधिकारी सचिन शर्मांची सक्त ताकीद
एलआयसीचा विक्रमी नफा; भागधारकांना लाभांशासह बोनस शेअर्सची भेट
शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा चिंता
मोदींच्या ५ देशांच्या दौऱ्याने भारताला आर्थिक बूस्ट
हल्ल्याच्या आदल्या दिवशी हे तीन सशस्त्र दहशतवादी एका स्थानिक व्यक्तीच्या घरी थांबले होते. स्थानिक परवेज अहमद याने सांगितले की, २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता तो आपल्या पत्नी आणि मुलासह ‘ढोक’ (झोपडी) मध्ये बसला होता. माझे मामा बशीर अहमद जोथड आत आले आणि शांत राहण्यास सांगितले. ते बाहेर गेले आणि काही क्षणांतच बंदुका घेऊन तीन पुरुषांसह परतले. ते ढोकमध्ये बसले. त्यांनी पाणी मागितले कारण ते खूप थकलेले आणि तहानलेले होते. त्यांनी सांगितले की ते खूप दूरवरून आले आहेत,” असे परवेजने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
“मी त्यांना पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी सांगितले की, अल्लाच्या मार्गात लढणाऱ्या आणि काश्मिरी मुस्लिमांच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करणाऱ्यांना पाणी दिल्याबद्दल मला ‘सवाब’ मिळेल. ते पंजाबी लहेजासह उर्दू बोलत होते आणि काश्मिरी वाटत नव्हते. मला समजले की ते मुजाहिद होते. त्यांनी मला त्यांच्या बॅगा आणि पाउच लपवण्यास सांगितले. मी त्या माझ्या अंथरुणाखाली लपवल्या. त्यानंतर मी पत्नी ताहिराला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले,” असेही त्याने म्हटले.
परवेज अहमद आणि बशीर अहमद जोथर यांना २२ जून रोजी या तीन दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपपत्रानुसार, बैसरन दरीत प्रवेश करण्यापूर्वी हे तिघे एका झाडाखाली बसून दुपारचे जेवण करत होते. काही वेळानंतर त्यांनी आपल्या बॅगमधून चादरी काढून अंगावर घेतल्या.
त्यांपैकी दोघे एका ओढ्याजवळ गेले, जिथून पाणी बैसरनमध्ये प्रवेश करते, आणि तेथे बसून परिसरातील हालचालींवर नजर ठेवत होते. काही वेळानंतर ते तिसऱ्या दहशतवाद्याकडे परतले, जिथे त्यांनी आपले सामान ठेवले होते. त्यानंतर तिघांनी आपापल्या बॅगा तिथेच ठेवल्या आणि पुन्हा त्या जागेकडे प्रस्थान केले. अंतिम हालचाल सुरू करताना त्यांपैकी एकाने डोक्यावर ग्रोप्रो अॅक्शन कॅमेरा लावला होता आणि त्यांनी कुंपणाखालून पार्कमध्ये प्रवेश केला.
दोन दहशतवादी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे शौचालयांच्या बाजूने गेले, तर तिसरा झिपलाइनच्या शेवटच्या भागाकडे गेला.
दुपारी २:२३ वाजता त्यांपैकी एकाने M-4 कार्बाईनमधून पहिली गोळी झाडली. काही सेकंदांतच उर्वरित दोघांनी ढाबे आणि उताराच्या भागातून AK-47 रायफल्सने गोळीबार सुरू केला. “दक्षिणेकडील झिपलाइन आणि उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार येथून झालेल्या समन्वित गोळीबारामुळे मध्यवर्ती भाग ‘किल झोन’मध्ये बदलले,” असे आरोपपत्रात म्हटले आहे.
NIA नुसार, आरोपींनी जाणीवपूर्वक मध्यवर्ती कुरणाला ‘किल झोन’ बनवले, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांचा बळी जाईल. पळून जाताना दहशतवाद्यांना कुंपणाबाहेर झाडांमागे लपलेले तीन नागरिक दिसले. त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन अगदी जवळून गोळ्या झाडल्या.
पळून जाण्याच्या मार्गावर त्यांनी एका व्यक्तीला थांबवून ‘कलमा’ म्हणण्यास सांगितले. त्याने कलमा म्हटल्यावर त्याला सोडून दिले. पार्कमधून बाहेर पडल्यानंतर दहशतवाद्यांनी आनंद व्यक्त करत हवेत गोळ्या झाडल्या. आरोपपत्रानुसार, “यातून कोणताही पश्चात्ताप नसल्याचे आणि त्यांच्या दहशतवादी उद्दिष्टांप्रती सततची बांधिलकी दिसून येते.”







