देशाच्या राजधानीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा यांच्यात मुख्य तिरंगी लढत रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच निवडणुकीनिमित्त सोमवार, २७ जानेवारी रोजी ‘आप’ पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत.
आप पक्षाने जाहीर केलेल्या घोषणांमध्ये रोजगार, आरोग्य सेवा, शिष्यवृत्ती, मोफत वीज, २४ तास पाणी, विद्यार्थ्यांना मोफत बस, रेशन कार्ड, मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत अशा १५ मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासनही दिले आहे. याआधीही हे आश्वासन देण्यात आले होते मात्र, त्याची पूर्तता होऊ न शकल्याने हे आश्वासन परत देण्यात आले आहे. आवरून आप सरकारसह अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली जात आहे.
याशिवाय महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिलेला बँक खात्यात २१०० रुपये देण्यात येणार आहेत. संजीवनी योजनेच्या माध्यमातून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत. चुकीचे पाणी बिल माफ होणार असून पुन्हा सरकारमध्ये आल्यास २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असं आश्वासन ‘आप’कडून देण्यात आले आहे.
दिल्लीतील सर्व रस्ते युरोपसारखे बनवण्यासाठी पावलं उचलली जातील, असं आश्वासन देण्यात आले आहे. तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील विद्यापीठांमध्ये दलित मुलांच्या खर्चाची सर्व जबाबदारी दिल्ली सरकारची असणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा देण्यात येईल. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये ५० टक्के सूट दिली जाईल. पुजारी आणि ग्रंथींना प्रत्येकी १८ हजार रुपये दिले जातील. तसेच दिल्लीत भाडे तत्वावर राहणाऱ्या नागरिकांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा दिली जाईल. दिल्लीतील गटारांची स्वच्छता राखण्यासाठी योग्य उपायोजना करण्यात येतील. जुनी गटारे दीड वर्षात बदलली जातील, असं आश्वासन आप पक्षाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा..
महाकुंभमध्ये आलेले तरुण भाविक म्हणतात, पवित्र स्नान केल्यानंतर शांत वाटले
‘मुडा’ जमीन घोटाळा प्रकरणाचा अहवाल लोकायुक्तांकडून उच्च न्यायालयात सादर
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची चीनला भेट
दिल्लीतील सर्व गरिब नागरिकांना नवीन रेशनकार्ड देण्यात येतील. दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये दिले जातील. तर, ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षा चालकांना १० लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. तसेच कुटुंबासाठी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल. सर्व आरडब्ल्यूएसाठी खासगी सुरक्षा रक्षक देण्याची हमी पक्षाने दिली आहे.