१३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभाला दररोज लाखो भाविक भेट देत आहेत. देशासह परदेशातील नागरिकही सहभागी होत आनंद व्यक्त करत आहेत. याच दरम्यान केंद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आज (२७ जानेवारी) महाकुंभाला भेट दिली आणि संगमात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक संत देखील उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आणि बाबा रामदेव यांचे संगमात स्नान करतानाचे व्हिडीओ समोर आले, ज्यामध्ये सर्वजण आनंदी दिसत आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांच्या संगम स्नानआधीही मुख्यमंत्री योगींनी त्यांच्या मंत्रिमंडळासह महाकुंभला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी त्यांच्या मंत्र्यांसह संगममध्ये स्नान केले होते. आज पुन्हा गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित मुख्यमंत्री योगी यांनी संगमात स्नान केले.
हे ही वाचा :
दिल्लीकरांचे संपूर्ण कुटुंबच केजरीवाल सरकार चालवणार; जाहीरनाम्यात १५ गॅरंटी
छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ‘लेझीम’ प्रकार मोठा नाही!
महाकुंभमध्ये आलेले तरुण भाविक म्हणतात, पवित्र स्नान केल्यानंतर शांत वाटले
आजच्या सकाळच्या आकडेवारीनुसार, ६०.१९ लाखांहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले होते. महाकुंभाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १३.२१ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. काल रविवार असल्याने भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. संगमात स्नान करण्यासाठी भाविकांना दोन तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागल्याचे समोर आले होते.
भारताची बॉक्सर मेरी कोम यांनी देखील काल महाकुंभाला भेट देत संगमात स्नान केले. मला खूप आनंद झाला की मी या कुंभमेळ्याचा भाग होऊ शकले. व्यवस्था इतकी चांगली आहे की माझ्याकडे शब्दच नाहीत, असे मेरी कोम म्हणाल्या. तसेच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी देखील काल संगमात स्नान केले.