छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकताच टीजर समोर आला आहे. चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. याच दरम्यान, चित्रपटातील काही दृश्यांमुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत ते दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती उदयन राजे भोसले यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. यानंतर अखेर चित्रपटातील ते दृश्य हटवण्यात येणार आहेत. ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ‘ते’ दृश्य मोठे नसल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी म्हटले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज (२७ जानेवारी) भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, राज ठाकरे यांचे इतिहासाचे, महाराजांवर वाचन असल्यामुळे चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. यावर त्यांनी चांगल्या सूचना केल्या.
चित्रपटातील महाराजांचा लेझीम डान्स हे दृश्य आम्ही डिलीट करणार आहोत, राज ठाकरेंनी सुद्धा तोच सल्ला दिला. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. पण त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा आपले राजे असे नाचत नसतील असे वाटत असेल तर हा चित्रपटाचा छोटा भाग असून तो आम्ही डीलेट करू.
हे ही वाचा :
महाकुंभमध्ये आलेले तरुण भाविक म्हणतात, पवित्र स्नान केल्यानंतर शांत वाटले
‘मुडा’ जमीन घोटाळा प्रकरणाचा अहवाल लोकायुक्तांकडून उच्च न्यायालयात सादर
नालासोपारामधून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात महिलांसह नऊ बांगलादेशींना अटक
ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज काय होते, एक महान योद्धा-महान राजा कसा होता हे संपूर्ण जगाला माहीत व्हावा यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला. शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. छत्रपती संभाजी महाराज होळीचा उत्सव साजरा करायचे हे कादंबरीत लिहिले आहे. होळीच्या आगीमधील नारळ महाराज खेचून बाहेर काढायचे, याचा उल्लेखही त्यामध्ये आहे.
लेझीम हा आपला पारंपारिक खेळ आहे. महाराज लेझीम का खेळले नसतील कधी?, असा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी राजे २० वर्षांचे होते. बऱ्हाणपूर जिंकल्यानंतर जेव्हा राजे रायगडावर आले तेव्हा खेळले असतील, यामध्ये गैर काय?, असे मला वाटते. पण जर लोकांच्या-शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा, महाराजांपेक्षा मोठा नाहीये आणि तो आम्ही डिलीट करू, असे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले.