पुण्यातील दिनानाथ रुग्णालयाची सध्या चौकशी सुरू आहे. यासाठी समिती नेमण्यात आल्या आहेत. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या उपचारासाठी रुग्णालयाने १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप रुग्णालयावर आहे. पैसे न जमा केल्याने महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना वेळ लागला आणि महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी तीन समितीत्यांकडून चौकशी सुरु आहे, यामध्ये राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल सादर झाला आणि त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान, दिनानाथ रुग्णालयाच्या डिपॉझिट प्रकरणावर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना एक नोटीस जारी करण्यात आली आहे.
रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. ‘आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा,’ अशा संदर्भातले आदेश प्रत्येक खासगी रुग्णालयाला देण्यात आले आहे.
हे ही वाचा :
संयुक्त अरब अमिरातच्या उपपंतप्रधानांच्या भारत दौऱ्यातून काय साध्य होणार ?
कुणाल कामरा यांच्या याचिकेवर काय म्हणाले न्यायालय
संघप्रमुख मोहन भागवत लखनऊमध्ये दाखल
पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.