भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल चौकात पहिल्यांदा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत इतिहास रचला गेला. भारताचा राष्ट्रीय ध्वज वृद्ध, तरुण आणि लहान मुलांनी संयुक्तपणे फडकवला. विशेष म्हणजे, २०१९ पर्यंत याठिकाणी दगडांचा पाउस पडत होता आणि आज याच ठिकाणी सर्वजण एकत्र येवून देशाचा तिरंगा फडकवताना, राष्ट्रगीत गाताना दिसले. कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक लोक उपस्थित होते, त्यापैकी बहुतेक उत्साही तरुण होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि देशभक्तीवरील गाण्यांमुळे सर्वत्र अभिमानाचे व एकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अशांततेसाठी ओळखला जाणारा परिसर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामुळे बदल घडल्याचे दिसले. यावेळी राष्ट्रीय रायफल्स, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हे ही वाचा :
महाकुंभ: स्नान करण्यासाठी लांबच लांब रांगा, २५ लाख भक्त प्रतीक्षेत!
बांगलादेशला देण्यात येणारा निधी अमेरिकेने स्थगित केला
नागा साधूंना १५ मिनिटे दिली तर तुमचा इतिहास संपून जाईल!
जम्मू-काश्मीरमधील उरी येथेही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. एनएस ब्रिजपासून सुरू झालेल्या या यात्रेचा कालापहार ब्रिगेड सभागृहात समारोप झाला, यात आर्मी गुडविल स्कूल, उरी आणि जिल्हाभरातील सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांसह ५०० जणांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. शिक्षक, नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक समृद्ध झाला, सर्वांनी एकत्र येऊन एकात्मता आणि देशभक्तीची भावना साजरी केली.