पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) नवी दिल्लीत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्यावर लक्ष केंद्रित करून प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी या चर्चेचे नेतृत्व केले, त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि वरिष्ठ अधिकारी होते. कतारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी केले. तत्पूर्वी, कतारच्या अमीरांचे भारतात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि इतर जेष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
सोमवारी कतारचे अमीर नवी दिल्लीत पोहोचताच, पंतप्रधान मोदी प्रोटोकॉल तोडून स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. विमानतळावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारत हस्तांदोलन केले. पंतप्रधान मोदींशी भेट घेतल्यानंतर, अमीर यांनी विमानतळावर उपस्थित असलेल्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेत आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा :
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण महाकुंभात सहभागी, संगमात केले स्नान!
रवींद्र नाटयमंदिर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे २८ ला उद्घाटन
अनधिकृत मासेमारी नियंत्रण, सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना
संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून प्रेक्षक संतापला, मल्टिप्लेक्सची स्क्रीन टराटरा फाडली!
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये अमीर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा हे चर्चेचे मुख्य विषय होते. आज, भारत आणि कतारमधील वार्षिक व्यापार सुमारे १४ अब्ज डॉलर्सचा आहे. पुढील पाच वर्षांत ते दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.
यावेळी दोन्ही देशांनी दुहेरी कर आकारणीसह चार महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, नावीन्य, अन्न सुरक्षा, संकृती, यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील अनेक सामंजस्य करारांची देवाण घेवाण झाली.
२०२३-२४ मध्ये दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार १४ अब्ज डॉलर्स होता, जो मागील वर्षी १८.७७ अब्ज डॉलर्स होता. कतार हा भारताचा एलएनजी आणि एलपीजीचा सर्वात मोठा पुरवठादार राहिला आहे, तर भारत कतारला धान्य, लोखंड आणि पोलाद, कापड आणि यंत्रसामग्री निर्यात करतो.