टिकटॉक भारतात परतण्याची शक्यता सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय आयटी, माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, चिनी शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील बंदी मागे घेण्याची कोणतीही योजना विचाराधीन नाही.
मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितले की, टिकटॉकच्या पुनरागमनावर सरकारमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्स भारतात पुन्हा येण्याच्या तयारीत असल्याच्या अटकळींवर उत्तर देताना ते म्हणाले, “कोणत्याही स्तरावरून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.”
गेल्या महिन्यात भारतामध्ये एअरटेल आणि व्होडाफोनसह काही ब्रॉडबँड आणि मोबाईल नेटवर्कवर टिकटॉकची वेबसाइट काही काळासाठी उपलब्ध झाल्याचे आढळून आले होते. या तांत्रिक बिघाडामुळे अनेक लोक असा अंदाज लावू लागले की हे पोर्टल लवकरच भारतात लाईव्ह होईल आणि बंदी उठवली जाईल. दरम्यान, आता सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे टिकटॉकवर बंदी कायमच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जून २०२० मध्ये भारतात पहिल्यांदा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेचा हवाला देत सरकारने त्यांच्यावर बंदी घातली होती. या बंदीनंतर, ॲपल आणि गुगलने हे ॲप्स भारतीय सर्व्हरवरून काढून टाकले आणि जानेवारी २०२१ मध्ये हे निर्बंध कायमचे लागू करण्यात आले. त्यावेळी भारत हा टिकटॉकचा सर्वात मोठा वापरकर्ता आधार होता, जिथे २० कोटींहून अधिक लोक प्लॅटफॉर्म वापरत होते.
हे ही वाचा :
नेपाळमधील निदर्शनांनंतर सीमेवर अलर्ट!
इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी
हल्ल्याला इस्रायल देणार प्रत्युत्तर
अयोध्या दीपोत्सव : २६ लाखांपेक्षा जास्त दिव्यांच्या प्रज्वलनाने होणार नवे वर्ल्ड रेकॉर्ड
भारत सरकारने २०२० मध्ये म्हटले होते की टिकटॉकसह ५९ चिनी ॲप्स वापरकर्त्यांचा डेटा चीनमधील सर्व्हरवर पाठवत आहेत. अशा परिस्थितीत, लाखो वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर आणि डेटा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. भारतात काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीने भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातच संग्रहित करावा अशी भारत सरकारची इच्छा होती. टिकटॉकने ही अट पूर्ण केली नाही आणि त्यानंतर सरकारने त्यावर कारवाई केली.







