महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) ताब्यात असलेल्या अभिनेत्री रान्या रावने चौकशीदरम्यान सांगितले की, दुबईतून सोन्याची तस्करी करण्याची ही पहिलीच वेळ होती. तिला अज्ञात नंबरवरून कॉल येत असल्याचेही तिने सांगितले. विशेष म्हणजे, युट्यूबवर व्हिडीओबघून सोने लपवण्याचे शिकल्याचा दावा तिने केला.
कर्नाटकचे डीजीपी के रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिला बेंगळुरू विमानतळावरून १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने शरीरावर बांधलेल्या बिस्किटांच्या स्वरूपात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती. तिने आपल्या जबाबात सांगितले की, “मला १ मार्च रोजी एका परदेशी फोन नंबरवरून फोन आला. गेल्या दोन आठवड्यांपासून मला अज्ञात परदेशी नंबरवरून फोन येत होते. मला दुबई विमानतळाच्या टर्मिनल ३ वरील गेट ए वर जाण्याचे निर्देश देण्यात आले. मला दुबई विमानतळावर सोने गोळा करून बेंगळुरूमध्ये पोहोचवण्यास सांगण्यात आले,” असे ती म्हणाली.
हे ही वाचा :
होळीनिमित्त लखनऊमध्ये विकली जातेय १ लाख रुपयांची चांदीची पिचकारी
एका अब्ज भारतीयांना एआय-चालित डिजिटल इकॉनॉमीमध्ये आणण्याची हीच योग्य वेळ
स्टील क्षेत्रातील संशोधन, विकासाला मिळणार चालना
“दुबईहून बेंगळुरूला सोने तस्करी करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मी यापूर्वी कधीही दुबईतून सोने आणले नाही किंवा खरेदी केलेले नाही,” असे राव यांनी डीआरआय अधिकाऱ्यांना सांगितले. ती पुढे म्हणाली, “सोने प्लास्टिकने झाकलेल्या दोन पॅकेटमध्ये होते. मी विमानतळाच्या शौचालयात जावून माझ्या शरीरावर सोन्याचे बार लावले. मी माझ्या जीन्स आणि शूजमध्ये सोने लपवले. हे कसे करायचे ते मी YouTube व्हिडिओंवरून शिकले,” असे राव हिने महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांना सांगितले.
तथापि, तिने फोन करणारा किंवा प्रशिक्षक कोण आहे याची ओळख पटवण्यास नकार दिला. “मला कोणी फोन केला हे मला पूर्णपणे माहित नाही, असे तिने सांगितले. दरम्यान, अभिनेत्रीने संपूर्ण माहिती दिली नसली तरी डीआरआयने तपास सुरू ठेवला आहे.