30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषवयाच्या ९५व्या वर्षात पदार्पण करणारे माधव गोठोस्कर म्हणून आहेत 'फिट'

वयाच्या ९५व्या वर्षात पदार्पण करणारे माधव गोठोस्कर म्हणून आहेत ‘फिट’

शिस्तप्रिय, वक्तशीर पंच म्हणून क्रिकेटमध्ये ओळख

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून वक्तशीर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माधव गोठोस्कर ३० ऑक्टोबरला ९५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. न्यूज डंकाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या आयुष्याच्या दीर्घ प्रवासाबद्दल जाणून घेतले.

माधव गोठोस्कर हे आज ९४ वर्ष पूर्ण करत असले तरी त्यांची स्मरणशक्ती दांडगी आहे. अजूनही आपल्या पहिल्या सामन्यातील आठवणी, आपल्या आयुष्यातील महत्त्वाची प्रसंग त्यांना लखलखीत आठवतात.

गोठोस्कर पंचगिरीकडे कसे वळले?

गोठोस्कर म्हणतात, टाइम्स ऑफ इंडियाच्या टीममध्ये मी वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असे. १९५१चा तो काळ होता. तेव्हा मैत्रिपूर्ण सामने होत. तेव्हा आम्हालाच पंच म्हणून काम करावे लागत असे. तेव्हा मला ते काम सोपवले जात असे. मी व्यवस्थित पंचगिरी करत असल्यामुळे माझ्यावर ती जबाबदारी सोपविली जात असे. मग मी १९६१ ला स्थानिक पंच परीक्षा पास झालो, त्यानंतर मग १९६७ला रणजी पंच म्हणून परीक्षा दिली १९६९ ला अखिल भारतीय स्तरावरील पंच होण्यासाठी परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झालो. १९७२-७३ला कसोटी पंच परीक्षा पास झालो.  कसोटी पंच म्हणून काम करताना अनेक नामांकित खेळाडूंचा खेळ जवळून पाहता आला. मी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांची ५ शतके प्रत्यक्ष मैदानात पंच म्हणून काम करताना पाहू शकलो. विव रिचर्ड्स,  दिलीप वेंगसरकर आणि श्रीलंकेचा दुलिप मेंडीस यांची प्रत्येकी २ शतके मी पाहिली.

आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या सामन्यांविषयी गोठोस्कर सांगतात की, पहिली रणजी लढत पंच म्हणून मी १९६७ला केली. वल्लभनगर आणंदला ही लढत झाली. रणजीत पहिला निर्णय देताना मी नरी कॉन्ट्रॅक्टरना पायचीत बाद दिले होते. कसोटीलाही माझा पहिला निर्णय पायचीतचाच होता. तेव्हा नवाब पतौडीला मी बाद दिले होते.

गावस्कर यांचे शतक होऊ नये म्हणून झहीर अब्बासची चाल

कसोटी क्रिकेटबद्दल ते सांगतात की, १९८३ला बेंगळुरूला झालेली लढत तणावपूर्ण होती. त्या सामन्यात २० अनिवार्य षटके टाकणे आवश्यक होते. सकाळपासून भारताचे सुनील गावस्कर आणि पाकिस्तानचे झहीर अब्बास मला त्याबद्दल विचारत होते. मीही त्यांना अनिवार्य षटके टाकावीच लागतील, असे सांगितले. १४ षटके झाली असताना गावस्कर ८२ धावांवर होते. तेव्हा पाक खेळाडू मैदानातून निघू लागले. अब्बास म्हणाला की, सामन्याची वेळ संपली आहे. ४.३० वाजले आहेत. खरे तर गावस्कर यांचे शतक पूर्ण होऊ नये म्हणून ही त्यांची चाल होती. पण मी स्पष्ट शब्दांत त्याला सांगितले की, भारतातील नियमांप्रमाणे २० अनिवार्य षटके टाकावीच लागतील. अन्यथा मला सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने द्यावा लागेल. शिवाय, निलंबनाची कारवाईही होईल. तेव्हा अब्बास आपल्या सहकाऱ्यांसह मैदानात आला. तो परतल्यावर स्टेडियममधील लोकांनी माझे कौतुक केले. कन्नड भाषेत माझे कौतुक करत असल्याचे मला कुणीतरी सांगितले. स्टेडियममध्ये असलेल्या पोलिस आयुक्तांनीही टोपी काढून सामन्यात गोंधळ होऊ दिला नाही, याबद्दल माझे आभार मानले.

दिल्लीत १९८३ला झालेल्या सामन्याबद्दल गोठोस्कर सांगतात की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात गावस्करने २९वे शतक ठोकले होते. ब्रॅडमनच्या विक्रमाशी ती बरोबरी होती. त्यादिवशी सांगितले राष्ट्रपती झैलसिंग व तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधीची भेट सगळ्या खेळाडूंशी होणार होती. इंदिरा गांधींची भेट घ्यायला उभे असताना एक धिप्पाड माणूस आला आणि त्याने आम्हाला बाजूला व्हायला सांगितले. पण कोटावरचा लोगो पाहून त्याला कळले की आम्ही पंच आहोत. तेव्हा तो म्हणाला की, तुम्ही आपली टीम घेऊन एका बाजुला उभे राहा. आणि दुसऱ्या पंचाने आपली दुसरी टीम घेऊन दुसरीकडे उभे राहा. पंचांच्याच या टीम असतात असा त्याचा समज होता.

गोठोस्कर सांगतात की, सर्वात गंमत म्हणजे १९८३ विंडीजला वानखेडेवर मी आणि स्वरूप किशन पंच म्हणून होतो. एक बाई कटलेट, कांदा भजी, पॅटीस घेऊन आमच्याकडे आली. तिने आम्हाला हे पदार्थ देत आमचे आभार मानले. आम्ही विचारले तेव्हा ती म्हणाली की, सामना पाच दिवस चालल्याने मला हे पदार्थ विकता आले. याआधी इथे ज्या चार लढती झाल्यात त्या अडीच दिवसांतच संपल्यामुळे माझे नुकसान झाले होते.  पण यावेळी तुमच्यामुळे सामना पाच दिवस चालला. त्याचे कारणही तिने मजेशीर दिले. तुम्ही दोन्ही संघातले  प्रत्येकी चार फलंदाजांना नॉटआऊट दिलेत म्हणून सामना लांबला आणि त्याचा मला फायदा झाला.

म्हणून आहेत फिट

आपल्या या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात की, लहानपणापासून घरात चहाला परवानगीच नव्हती. १९४०ला आमचे कुटुंब शिवाजी पार्कला आले. तिथे ८० वर्षे मी राहिलोय. लहानपणी सकाळी सूर्यनमस्कार घालणे, श्लोक म्हणणे असा दिनक्रम असे. वडील पुजारी असल्यामुळे आहार, दिनक्रम याबाबतीत शिस्तप्रियता होती. जेवणात कांदा लसूण वर्ज्य होते. मांसाहार, अंडी मी कधीही खाल्ली नाहीत. जेवणात लसूण कधीही नव्हते. वक्तशीरपणा कटाक्षाने पाळला. आता चहा घेत असल्यामुळे सकाळी उठल्यावर चहा, ८.३० ला नाश्ता. त्यानंतर ११ वाजता काहीतरी खायचे. ११ ते १२.३० झोप घ्यायची. १ वाजता जेवण. मग टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या झाल्यावर ३ ला पुन्हा झोप. ४.३० पर्यंत झोप घेतल्यावर ५ वाजता चहा घेऊन शिवाजी पार्क जिमखान्यात जात असे. कोरोनाच्या काळात मात्र जिमखान्यात गेलो नाही. १९६० पासून जिमखान्यात जात होतो. १९८७ पर्यंत मी १६ वर्षे जिमखान्याचा अध्यक्ष होतो. २०१२ ते २०१८ या कालावधीत विश्वस्त होतो.

आणि डेसमण्ड हेन्सने गोठोस्करांची माफी मागितली

पूर्वीचे खेळाडूही पंचांशी चर्चा करत. नियमांविषयी माहिती घेत. त्यांचा आदरही राखत. वानखेडेवर डेसमण्ड हेन्सला चेंडूला हात लावला म्हणून मी बाद दिले होते. तेव्हा हेन्स म्हणाला की, मी तर चेंडू खेळून काढला होता. त्याला वाटले होते की, मी त्याला पायचीत दिले. पण त्याला नियम माहीत नव्हता त्यामुळे तो तक्रार करत होता. पण हे कर्णधार क्लाइव्ह लॉइडला समजल्यावर त्याने हेन्सला माझी माफी मागण्यास सांगितले होते.

गोठोस्करांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पंच तयार झाले. त्याबद्दल ते म्हणतात की, मी ज्या २० जणांना मार्गदर्शन केले ते पुढे रणजी पंच झाले. ३-४ जणांनी आंतरराष्ट्रीय वनडे सामन्याच पंच म्हणून काम केले तर एमवाय गुप्ते हे कसोटी पंच झाले. नव्या लॉटमध्येही अनेकांना माझ्याकडून मार्गदर्शन मिळाले. १९९७ला नऊ जणांना एक महिना रणजीसाठी मी मार्गदर्शन करत होतो. ९० टक्के पासिंगची अट त्या परीक्षेसाठी आहे. ते सगळे ९ जण उत्तीर्ण झाले. पण त्या विद्यार्थ्यांना गुप्त क्रमांक दिलेले असल्यामुळे कोण उत्तीर्ण झाले हे अन्य कुणीही सांगू शकत नसे. पण माझे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे राजन मेहरा यांनी मला सांगितले. पण मी विचारले की, तुम्हाला कसे कळले कारण त्यांचे क्रमांक तर गुप्त असतात. तेव्हा ते म्हणाले की, पायचीतचा नियम सहा ओळीत आहे. त्याची सुरुवात it should be a fair delivery यावरून होते आणि त्या ९ विद्यार्थ्यांनी आपल्या पेपरमध्ये अशीच सुरुवात केली आहे.  त्यावरून आम्हाला कळले की, ते तुमचेच विद्यार्थी असले पाहिजेत. कारण तुम्ही शिकवताना हेच उत्तर विद्यार्थ्यांना सांगत असत.

गोठोस्कर म्हणाले की, ३५ वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये परीक्षक होतो. २०००मध्ये एमसीसीचे नियम आले तेव्हा बीसीएने त्याचे मराठी भाषांतर केले. ते भाषांतर मी त्यांना करून दिले होते. ते करायला ९० तास लागले. ते पुस्तक अजूनही सुरू आहे.

पत्नीचे मोठे योगदान

आपल्या या प्रदीर्घ वाटचालीत पत्नी लीला यांचे मोठे योगदान असल्याचे गोठोस्कर सांगतात. मी मॅचच्या निमित्ताने सतत बाहेर असल्यामुळे मुलांची आणि घराची जबाबदारी पत्नी लीलाने उत्तमरित्या निभावली. त्यामुळे मुले भूषण आणि हर्ष  सॉफ्टवेअरमध्ये मास्टर्स डिग्री घेऊन परदेशात गेले. एक सध्या इंग्लंडमध्ये आहे तर आणि दुसरा अमेरिकेत. आमच्या विवाहाला २८ डिसेंबर २०२२ला ६६ वर्षे होतील. तिने प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन दिले २० महिने १९७० ते १९७१  या काळात नोकरी नसताना तिने घराची जबाबदारी उचलली.

आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे शरद पवारांच्या हस्ते मानपत्र मिळाले. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले तर मुंबई मराठी गंर्थसंग्रहालयातर्फे लता मंगेशकर यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा समीक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता.

अजूनही काही खेळाडू आपली आठवण काढतात. फोन करतात. ख्यालीखुशाली विचारतात.  २०१८साली मला ९० वर्षे पूर्ण झाली.तेव्हा मिड डे मध्ये एक लेख आला होता. त्यांच्याकडून कळले की, हा लेख वाचून एका माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने फोन केला होता. मी विचारले की कुणी फोन केला तेव्हा मला सांगण्यात आले की, वेस्ट इंडिजहून अँडी रॉबर्ट्स यांनी फोन केला आणि अभिनंदन केले. माल्कम मार्शल, होल्डिंग आपल्याशी चांगल्या गप्पा मारत असत. लॉइडही बऱ्याच नियमांच्या बाबतीत चर्चा करत असत.

सध्याच्या क्रिकेट पंचगिरीबद्दल गोठोस्कर म्हणतात की, आता थर्ड अंपायरकडे निर्णय जातो. त्यामुळे कुठेतरी मैदानावरील पंच आपली जबाबदारी झटकत असल्यासारखे वाटते. बहुतांश निर्णय ते तिसऱ्या पंचाकडेच सोपवतात. गोठोस्कर सांगतात की, तेव्हा आम्ही वाकून पंचगिरी करत असू. त्यामुळे चेंडूची नेमकी दिशा कळत असे. आता पंच सरळ उभे राहतात. त्यामुळे त्यांना दिशा कळते की नाही माहीत नाही.

बीसीसीआयने पंचांसाठी पेन्शन योजना सुरू केल्याचा आम्हा सगळ्यांना खूप लाभ झाल्याचे गोठोस्कर सांगतात. बोर्डाने पेन्शन सुरू केले ही आनंदाची घटना आहे. आता आम्हाला ४५ हजार रुपये पेन्शन मिळते. शिवाय, मेडीकल खर्च १० लाखांपर्यंत दिला जातो. त्यामुळे पंच स्वावलंबी झालेत. मुलांवर अवलंबून राहावे लागत नाही. पंचांची काळजी मिटलेली आहे.

गोठोस्कर अत्यंत शिस्तप्रिय असे आयुष्य जगले आहेत. अजूनही त्यांच्या शिस्तीचे, वक्तशीरपणाचे उदाहरण दिले जाते. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा