महाशिवरात्रीच्या उत्सवातील अंतिम अमृत स्नानाने महाकुंभ २०२५ चा आज (२६ फेब्रुवारी) समारोप झाला. महाकुंभ मेळ्यात तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात स्नान केले. कुंभमेळा हा केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर तो सनातन धर्माच्या महान सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची कल्पना देखील देतो.
अजूनही हजारो लोक घाटावर स्नान करत आहेत, त्यामुळे आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महाकुंभ मेळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजेपर्यंत १ कोटी ३२ लाख भाविकांनी संगमात स्नान केले. स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांवर प्रशासनाने १२० क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत स्वागत केले.
आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, महाकुंभ मेळ्यात ६६ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. प्रयागराजमधील भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सर्व व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल रद्द करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!
राहुल गांधी, उद्धव ठाकरे महाकुंभला गेले नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार टाका!
महाकुंभ मेळ्याच्या समारोप संध्येला प्रयागराजमध्ये सुखोई विमानांकडून कसरती
महाशिवरात्रीनिमित्त झेंडे, लाऊडस्पीकर लावण्यास विरोध; मदरशामधून दगडफेक
दरम्यान, दर १२ वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळा भरतो. प्रयागराजनंतर आता लोक पुढचा कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिक येथे होणार आहे. नाशिकमधील गोदावरीच्या काठावर होणारा हा कुंभमेळा शनिवार, १७ जुलै २०२७ रोजी सुरू होईल. तर १७ ऑगस्ट २०२७ कुंभमेळ्याची सांगता होईल.
शेवटचा कुंभमेळा २०१५ मध्ये नाशिकमध्ये भरला होता. दर १२ वर्षांनी नाशिक आणि उज्जैन येथे पूर्ण कुंभमेळा भरतो. तर हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये कुंभमेळा, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ आयोजित केले जातात आणि प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये ६ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला अर्धकुंभ म्हणतात. नाशिकनंतर, २०२८ मध्ये उज्जैनमध्ये पूर्ण कुंभमेळा भरेल, त्यानंतर २०३० मध्ये प्रयागराजमध्ये अर्धकुंभमेळा भरेल.