केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी सांगितले की, छत्तीसगडमधील नक्षलवादी चळवळीला आळा घालण्याच्या प्रयत्नात सरकारने फायदेशीर असे आत्मसमर्पण धोरण तयार केले आहे. नक्षलवाद्यांशी चर्चा करण्याच्या मागण्यांना संबोधित करताना शाह म्हणाले की, केंद्र आणि छत्तीसगडमधील भाजपा सरकार बस्तरसह संपूर्ण नक्षलग्रस्त प्रदेशाच्या विकासासाठी समर्पित असल्याने यात इतर काहीही बोलण्यासारखे राहिलेले नाही. तसेच त्यांनी बस्तरमध्ये शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, शांतता भंग करणाऱ्यांना यंत्रणा जोरदार प्रत्युत्तर देईल. तसेच त्यांनी अधोरेखित केले की, ३१ मार्च २०२६ हा दिवस या देशाच्या मातीतून नक्षलवादाला निरोप देण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
अमित शाह म्हणाले की, “काही लोक नक्षलवाद्यांशी चर्चेबद्दल बोलतात. पण, पुन्हा एकदा हे स्पष्ट करत आहे की, आमची दोन्ही सरकारे म्हणजेच छत्तीसगड सरकार आणि केंद्र सरकार, बस्तर आणि संपूर्ण नक्षलवादी प्रदेशाच्या विकासासाठी समर्पित आहेत. बोलण्यासारखे काय आहे? एक अतिशय फायदेशीर आत्मसमर्पण धोरण तयार केले आहे. त्यामुळे तुमची शस्त्रे खाली ठेवा. जर तुम्ही शस्त्रे उचलली आणि बस्तरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर सशस्त्र दल, सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिस योग्य प्रत्युत्तर देतील. ३१ मार्च २०२६ हा दिवस या देशाच्या मातीतून नक्षलवादाला निरोप देण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे,” असा ठाम विश्वास अमित शाह यांनी बस्तर दसऱ्याच्या उत्सवात एका सभेला संबोधित करताना व्यक्त केला.
स्वदेशीच्या आवाहनाचे समर्थन करताना अमित शाह म्हणाले, जर १४० कोटी लोकसंख्येने स्वदेशीचा संकल्प स्वीकारला तर आपल्या भारताला जगातील सर्वोच्च आर्थिक व्यवस्था होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच जीएसटी दर कमी करून मोठा दिलासा दिला आहे. जर आपण स्वदेशीची संस्कती स्वीकारली तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
हे ही वाचा :
रशियाचा युक्रेनच्या प्रवासी ट्रेनवर हल्ला; ३० जखमी
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, “भारत माझी मातृभूमी!”
संभलमधील मशीद पाडण्यास स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली
धर्मांतर प्रकरणी अमेरिकन नागरिकासह तीन जणांना अटक
नक्षलवादी चळवळीत सामील होण्याविरुद्ध सल्ला देताना अमित शाह यांनी बस्तरमधील तरुणांना हिंसेचा मार्ग सोडून देण्याचे आवाहन केले. नक्षलवादामुळे कोणाचाही फायदा झाला नाही असे सांगून शाह यांनी तरुणांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आणि नक्षलमुक्त होणाऱ्या गावांसाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामांचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, “दिशाभूल होऊन नक्षलवादात सामील होणाऱ्या तरुणांना हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्यास सांगा. गाव नक्षलमुक्त झाल्यानंतर, त्यांना विकासकामांसाठी एक कोटी रुपये वाटप केले जातील,” असे शाह म्हणाले.







