भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन हे गेले काही दिवस बेपत्ता होते. यानंतर डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कावेरी नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह श्रीरंगपट्टणजवळील कावेरी नदीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नियमितपणे श्रीरंगपट्टणजवळील कावेरी नदीच्या काठावर असलेल्या साई बाबा आश्रमात ध्यानासाठी जात असत. घटनास्थळी त्यांची दुचाकी आढळली असून, त्यांनी नदीत उडी घेतली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हैसूरमध्ये आपल्या पत्नीसह राहणारे डॉ. अय्यप्पन ७ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यांचा मृतदेह हाती लागताच तपास सुरू करण्यात आला आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.
अय्यप्पन यांचा जन्म १० डिसेंबर १९५५ रोजी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील येलंदूर येथे झाला होता. १९७५ मध्ये मंगळुरू येथून मत्स्यव्यवसाय विज्ञानात पदवी (BFSc) आणि १९७७ मध्ये मत्स्यव्यवसाय विज्ञानात पदव्युत्तर (MFSc) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी १९९८ मध्ये बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएचडी मिळवली.
भारतातील ‘ब्लू रेव्होल्यूशन’ मध्ये डॉ. अय्यप्पन यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी कृषी संशोधन व विकासात योगदान देत असताना अनेक समित्यांचे नेतृत्व केले आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. २०२२ मध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते. ते इंफाळ येथील सेंट्रल अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणूनही कार्यरत होते.
हे ही वाचा :
सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडिया, इंडिगोकडून ‘या’ शहरांना जाणारी उड्डाणे रद्द
अमेरिकेशी व्यापारावर चर्चा झालेली नाही; ट्रम्प यांच्या ‘त्या’ दाव्याचे भारताकडून खंडन
पाकिस्तानविरोधात भारताची कारवाई स्थगित आहे, समाप्त झालेली नाही!
“भारत- पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका ही मध्यस्थाची नव्हे तर रचनात्मक”
अनेक दशकांच्या कालावधीत, डॉ. अय्यप्पन यांच्या मत्स्यपालन आणि शाश्वत शेतीतील कारकिर्दीत त्यांनी अनेक नेतृत्व भूमिका बजावल्या. त्यांनी भुवनेश्वरमधील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संस्था (CIFA) आणि मुंबईतील केंद्रीय मत्स्यपालन संस्था (CIFE) चे संचालक म्हणून काम केले. ते हैदराबादमधील राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ (NFDB) चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते आणि नंतर त्यांनी भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागात (DARE) सचिवपद भूषवले.
