गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह जलस्रोत क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील एकूण पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
महापालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत धरणांतील पाणीसाठ्यात तब्बल १२.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर केवळ ४८ तासांत पाणीसाठ्यात २४.४४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून, मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ही मोठी वाढ मानली जात आहे.
सात धरणांमध्ये किती पाणीसाठा?
बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात धरणांमध्ये एकूण ५ लाख ९८ हजार ५८९ दशलक्ष लिटर (एमएल) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या ४१.३६ टक्के आहे.
धरणनिहाय स्थिती अशी आहे –
- अप्पर वैतरणा – २०.६६ टक्के
- मोडक सागर – ९४.८२ टक्के
- तानसा – ६९.३५ टक्के
- मिडल वैतरणा – ३४.६८ टक्के
- भातसा – ३५.५९ टक्के
- विहार – १०० टक्के (पूर्ण क्षमतेने भरले)
- तुळशी – १०० टक्के (पूर्ण क्षमतेने भरले)
सततच्या मुसळधार पावसामुळे विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत. विहार धरण मंगळवार, ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली. तुळशी धरण त्यानंतर रात्री ११.४३ वाजता भरून वाहू लागले. यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक संकेत मानला जात आहे. मोडक सागर धरणात ९४.८२ टक्के पाणीसाठा झाला असून, आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास हे धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
जलाशय क्षेत्रात मुसळधार पाऊस
गेल्या २४ तासांत जलाशय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली.
- अप्पर वैतरणा – ३०९ मिमी
- मोडक सागर – २५ मिमी
- तानसा – ३१९ मिमी
- मिडल वैतरणा – १७४ मिमी
- भातसा – २०० मिमी
- विहार – ७७ मिमी
- तुळशी – १२२ मिमी
- भांडूप संकुलातही २४ तासांत ६१.०० मिमी, तर या हंगामात आतापर्यंत १,६६३.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा:
शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या
बंगालमध्ये बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार
“केवळ मुंबई महानगरपालिकेला दोष देता येणार नाही, नागरिकही जबाबदार”
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
जून महिन्यात कमी झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणी जमा होत असून, मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने धरणांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.







