ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नाथन लायन याला सध्या तरी निवृत्त होण्याचा काही विचार नाही. ३७ वर्षांचा हा खेळाडू आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अजून काही मोठं साध्य करायचं ठरवून आहे — विशेषतः भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे आणि अजून एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकणे हे त्याचे मोठे लक्ष्य आहे.
२०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध WTC जिंकला होता आणि त्यात लायनने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र यावर्षी लॉर्ड्समध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.
२०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या लायनने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध ३ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. त्याच्या नावावर ५५६ कसोटी बळी असून तो ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे शेन वॉर्न (७०८) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) आहेत.
लायन म्हणाला, “माझं एक स्वप्न आहे — भारतात आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकायची. अजून एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणं हेही माझं ध्येय आहे.”
ऑस्ट्रेलियाचं पुढील वेळापत्रक पाहता, जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोट्या, आणि वर्षाअखेरीस इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या लढती होणार आहेत. त्यामुळे लायनकडे मॅकग्राच्या विक्रमाला मागे टाकण्याची चांगली संधी आहे.
त्याने पुढे सांगितलं, “वॉर्न खूप दूर आहेत. माझ्या मते ते आतापर्यंतचे सर्वात महान क्रिकेटपटू आहेत. मी सध्या एका जबरदस्त संघाचा भाग आहे आणि हाच मला प्रेरणा देतो खेळत राहायला.”
