गाड्यांची सुविधा देणाऱ्या कंपन्या ओला आणि उबेर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या दोन्ही कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. ग्राहकाच्या मोबाईल प्रकारानुसार सेवांवर कमी-अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याच्या प्रकरणावरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
कॅब राईड बुक करण्यासाठी ग्राहक आयफोन किंवा अँड्रॉइडपैकी कोणता डिव्हाइस वापरत आहे त्यावर शुल्क आकारले जात असल्याची बाब समोर आली होती. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा देखील सुरू होती. या वृत्तानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कारवाई केली आहे. भिन्न किंमतींच्या अहवालांवर स्पष्टीकरण मागण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी कॅब एग्रीगेटर्स ओला आणि उबेर यांना नोटीस जारी केली. नोटीसमध्ये, CCPA ने कंपन्यांना त्यांच्या किंमतींच्या पद्धती स्पष्ट करण्यास आणि संभाव्य भेदभावाच्या तक्रारी दूर करण्यास सांगितले आहे. भाडे मोजणीत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तपशीलवार प्रतिसाद मागितला आहे.
हे ही वाचा :
दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत, न्यायालयाने सुनावले
लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव! १०,००० एकर क्षेत्र जळून खाक
‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी महिलेला मुंबईतून अटक
डिसेंबरमध्ये, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने उबेरवर एका विशिष्ट स्थानासाठी आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये वेगवेगळे भाडे दर्शवणारे दोन फोनचे चित्र शेअर केले होते. यानंतर या प्रकरणावर जबरदस्त चर्चा झाली होती. उबेरने हे आरोप फेटाळले होते. मात्र, इतर सोशल मीडिया वापरकर्तेही या चर्चांमध्ये सामील झाले आणि हा मुद्दा उचलून धरण्यात आला. यानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी CCPA ला ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या प्लॅटफॉर्मला नोटीस पाठवत यात हस्तक्षेप केला.