शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेला भाविकांकडून नामांकित म्हणजेच ब्रँडेड खाद्यतेल अर्पण केले जावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. १ मार्च पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांनी याबद्दलची माहिती दिली. शनिशिंगणापूरचा ग्रामसभेचा तसा ठरावही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शनिमूर्तीच्या शीळेला भाविकांकडून अखाद्यतेलही अर्पण केले जाते. अखाद्यतेलामध्ये विविध प्रकारची रसायने असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रसायनांमुळे मूर्तीची झीज होऊ शकते. या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे दरंदले म्हणाले. देवस्थान विश्वस्त मंडळाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या संदर्भातील माहिती परिसरातील खाजगी व्यावसायिक, देवस्थानच्या आवारातील दुकानदार, गाळेधारक अशा सुमारे ३०० जणांना दिली आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळांने निर्णय घेतल्यानंतर शनिशिंगणापूरच्या ग्रामसभेतही तसा ठराव करण्यात आला.
हेही वाचा..
मुंबईतील रंगशारदा नाट्य मंदिरात राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा
नवा विक्रम! महाकुंभ मेळ्यादरम्यान आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध असल्या कारणावरून तीन सरकारी कर्मचारी बडतर्फ
रोहिंग्या निर्वासितांना `शिक्षणाचा हक्क` देऊन देशाची धर्मशाळा करायचीय का?
भाविकांच्या श्रद्धेनुसार २५० मिली. पासून ते ११ डब्यांपर्यंत तेल वाहिले जाते. अनेक भाविक प्लास्टिकच्या पिशवीतून सुट्टे तेलही अर्पण करण्यासाठी आणतात. हे तेल अखाद्य स्वरूपाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या अखाद्यतेलातील रसायनांमुळे शनिमूर्तीची संभाव्य झीज टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे दरंदले यांनी सांगितले.
आता शनिदेवाला तेल अर्पण करण्यासाठी सुट्टे तेल वाहू दिले जाणार नाही. खाद्य स्वरूपाचे तेलच वाहू दिले जाईल. या तेलाच्या पिशवीवर किंवा बाटलीवर ते खाद्यतेल असल्याचा उत्पादकाचा शिक्का तसेच आयएसआय मार्क पाहिला जाईल. यासाठी महाद्वारावर कर्मचारी नियुक्त केले जातील असे त्यांनी सांगितले. शनिशिंगणापूर देवस्थान सातत्याने वेगवेगळ्या निर्णयामुळे तर कधी देवस्थानच्या निर्णयामुळे विविध संघटनांकडून होणाऱ्या आंदोलनाने चर्चेत असते.