केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, दोन मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांचे अंत्यदर्शन राजकीय, सामाजिक, पर्यटन आदी विविध क्षेत्रांतील मंडळींनी घेतले. ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून १९८४ साली त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली आणि मुंबईत कुटुंबासह स्थायिक झाले.
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात केसरीभाऊ पाटील यांचा १९३५ साली जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली. कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि पर्यटनक्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी म्हणून‘केसरी टूर्स’ला नावलौकिक मिळवून दिला.
हेही वाचा..
शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार
मुंबईतील रंगशारदा नाट्य मंदिरात राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा
नवा विक्रम! महाकुंभ मेळ्यादरम्यान आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध असल्या कारणावरून तीन सरकारी कर्मचारी बडतर्फ
सध्या कंपनीच्या देशासह जगभरात शाखा आहेत. पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना पर्यटन क्षेत्रातील चालते – बोलते विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रांसह पर्यटन क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो – मुख्यमंत्री
पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. ‘केसरी टूर्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.