भारतीय जाहिरात क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले पीयूष पांडे यांचे गुरुवारी निधन झालं. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अनेक जाहिरात कॅम्पेन्स खूप गाजली. ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘हमारा बजाज’सारख्या टॅगलाइनचे जनक म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली.
जाहिरात उद्योगात पीयूष पांडे यांचे मोठे नाव होते. त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर घराघरांमध्ये ब्रँड्सची ओळख बनली. त्यांनी एशियन पेंट्ससाठी ‘हर खुशी में रंग लाए’ हा कॅम्पेंन स्लोगन लिहिला होता. याव्यतिरिक्त, कॅडबरीची जाहिरात ‘कुछ खास है’ देखील त्यांचेच कॅम्पेन होते. २०१६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरवही करण्यात आला होता. भारताच्या विविधतेतील एकता दर्शवणाऱ्या ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीताचेही लेखक तेच होते. त्यांनी फेविकोल, हच यांसारख्या कंपन्यांसाठीही अनेक यशस्वी जाहिरात कॅम्पेन्सचं नेतृत्व केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रचाराचा ‘अबकी बार, मोदी सरकार’ हा नाराही त्यांच्याच कल्पनेतून आला होता. त्यांनी प्रसिद्ध जाहिरात कंपनी ओगिल्वी इंडियासोबत जवळपास ४ दशकांपर्यंत काम केलं. या कंपनीत पीयूष पांडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या निधनासोबतच जाहिरात विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यापूर्वी ते एक क्रिकेटपटू होते. याव्यतिरिक्त त्यांनी चहाच्या बागेतही काम केलं होतं आणि बांधकाम क्षेत्रातही काम केलं.
हे ही वाचा:
रशियाच्या युद्ध उद्योगाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली तीन भारतीय कंपन्यांवर निर्बंध
आंध्र प्रदेशमध्ये बसला आग लागून १२ जणांचा मृत्यू
माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण
पीयूष पांडे यांची प्रसिद्ध जाहिरात कॅम्पेन्स
फेविक्विक आणि फेविकॉलच्या जाहिराती त्यांनी केल्या. ‘तोडो नही, जोडो’ ही टॅगलाईन त्यांनी दिली. गुगली वूगली वूश!! ही टॅगलाईन पॉन्ड्ससाठी सुचवली. वोडाफोन- झूझू, कॅडबरी डेअरी मिल्क- ‘कुछ खास है’, एशियन पेंट्स- ‘हर घर कुछ कहता है’ बजाज- ‘हमारा बजाज’, एअरटेल- ‘हर एक फ्रेंड जरुरी होता है’







