पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महायुतीमधील नेते, स्थानिक नेते घटनास्थळाची पाहणी करत आरोपीवर कठोर कारवाई मागणी करत आहेत. फरार आरोपी दत्तात्रेय रामदास गाडेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक दुपारी १२ वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच राज्यातील सर्व बस डेपोच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्वारगेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले. या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्वारगेटमधील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले. तर याठिकाणी नवे सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा :
महाकुंभ- एकतेचा महायज्ञ संपन्न झाला; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
डॉ. सुनील देवधर यांच्या उपस्थितीत रिडीफायनिंग एम्प्लॉयमेंट २०२५ चे आयोजन
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका
दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे विविध पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणी आरोपीच्या आई-वडील आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात सातत्याने खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत आणि आता बलात्कार अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणात पोलीस आणि सरकार काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.