महाराष्ट्र केसरी स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर पकडून नंतर त्याच पंचांना लाथ घातल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. शिवराज राक्षेला जाणीवपूर्वक पराभूत केल्याचा आरोपही ठेवण्यात आला. यावरून माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नाराजी व्यक्त करत या पंचांना गोळ्याच घालायला हव्या होत्या असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या लढती पार पडल्या. त्यात उपांत्य फेरीत नाट्यमय घडामोडी घडल्या. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र महेंद्र गायकवाड याला पंचांचा एक निर्णय पसंत पडला नाही आणि तो रिंगमधून बाहेर पडला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. तसेच शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करत पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं ३ वर्षांसाठी निलंबन केलं आहे.
पण या निर्णयानंतर चंद्रहार पाटील यांनी शिवराज राक्षे याची बाजू घेत त्याने पंचांना गोळ्याच घालायला हव्या होत्या, अशी वादग्रस्त टिप्पणी केली.
चंद्रहार पाटील यांनी म्हटले होते की, “पृथ्वीराज मोहोळ कारण एवढ्या कमी वयात महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं मोठी गोष्ट आहे, तो महाराष्ट्र केसरी झाला आहे, त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र शिवराजसोबत झालेला प्रकार १०० टक्के चुकीचा आहे. ही चूक पंचाची आहे. शिवराज राक्षे याने या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे, असे चंद्रहार पाटील म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी राक्षेने केलेल्या कृत्याबद्दल असहमती दाखवतानाच अशी वेळ कुस्तीगीरावर का येते असा सवालही उपस्थित केला आहे.