दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शुक्रवारी (३१ जानेवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. राष्ट्रपतींनी बैठकीला संबोधित करताना देशाला ‘विकसित भारता’चा संदेश दिला. यासोबतच प्रयागराज महाकुंभात झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, महाकुंभ हा भारताच्या सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जाणिवेचा उत्सव आहे. ‘सध्या महाकुंभाची ऐतिहासिक पर्वणी सुरू आहे. महाकुंभच्या संगमात करोडो भाविकांनी स्नान केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, संसदेच्या या बैठकीला संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आपण संविधान स्वीकारल्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला आणि काही दिवसांपूर्वी भारतीय प्रजासत्ताकानेही आपल्या वाटचालीला ७५ वर्षे पूर्ण केली. ही संधी लोकशाहीची जननी म्हणून भारताच्या अभिमानाला नवी उंची देईल. आज सरकार अभूतपूर्व कामगिरीद्वारे भारताच्या विकासाच्या या सुवर्णकाळाला नवी ऊर्जा देत आहे. तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम सुरू आहे. आज देश मोठे निर्णय आणि धोरणे विलक्षण वेगाने राबवताना पाहत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करून तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना नवीन घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, यासाठी ५ लाख ३६ हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. आदिवासी समाजातील पाच कोटी लोकांसाठी ‘धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे.
‘सरकारने तरुणांच्या शिक्षणावर आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उच्च शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे. टॉप ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधीही दिली जाणार असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण व्यवस्था तयार करत आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठीच मातृभाषेतून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. १३ भारतीय भाषांमध्ये विविध भरती परीक्षा आयोजित करून भाषेतील अडथळे दूर केले आहेत.
भारतीय संघांनी ऑलिम्पिक असो की पॅरालिम्पिक सर्वत्र चांगली कामगिरी केली आहे. अलीकडेच भारताने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतही आपला झेंडा फडकवला आहे. फिट इंडिया चळवळ चालवून आम्ही सशक्त युवा शक्ती निर्माण करत आहोत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताचे योगदान पुढे नेण्यासाठी ‘इंडिया एआय मिशन’ सुरू करण्यात आले आहे.