बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याचा सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी जुळत नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून सीसीटीव्हीमधील व्यक्ती आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीचा चेहरा जुळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एफएसएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा चेहरा ओळखला आहे.
आरोपी शरीफुल इस्लाम याचा चेहरा ओळखण्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी शरीफुल इस्लामचं असल्याची खात्री झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासादरम्यान त्याच्याकडून बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सापडले होते. त्यात त्याचे नाव शरीफुल इस्लाम आहे. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद रुहुल अमीन आहे. तर, शरीफुल याचे वय ३१ वर्षे आहे.
पोलिसांनी बांगलादेशी शरीफुल इस्लाम याला सैफ हल्ला प्रकरणात अटक केली होती. आरोपी विजय दास नावाने गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. तो बांगलादेशातील बारिशाल शहरातील रहिवासी आहे. आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले होते की, तो वांद्रे येथील सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी इमारतीच्या भिंतीवर चढला होता. तिथे पोहोचला तेव्हा सुरक्षा रक्षक झोपलेले होते. त्यानंतर तो मुख्य प्रवेशद्वारातून इमारतीत घुसला, जेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. आवाज होऊ नये म्हणून आरोपीने शूज काढून बॅगेत ठेवले आणि फोनही बंद केला होता. तपासादरम्यान इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नसल्याचे आढळून आले.
हे ही वाचा :
यंदाचा अर्थसंकल्प नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल!
हमासकडून सहा महिन्यांनंतर लष्करी नेता मोहम्मद डिफच्या मृत्यूची पुष्टी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!
सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाला बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने सांगितले की, आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचे कोणतेही कारण सध्या नाही. पोलिसांनी तपासासाठी आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने मागणी फेटाळली. न्यायालयाने सांगितले की, आरोपी दहा दिवसांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत होता आणि तपास पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड दाखवते. कोणताही नवा पुरावा समोर आल्यास पोलिस पुन्हा आरोपींच्या रिमांडची मागणी करू शकतात.