महाकुंभ मेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत आहेत. चेंगराचेंगरीच्या एका दिवसानंतर गुरुवारी (३० जानेवारी) परिसरात मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी सुमारे दोन कोटी भाविकांनी संगमात स्नान केले. आतापर्यंत सुमारे २९ कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे. दरम्यान, मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या घटनेनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने अमृत स्नानाच्या दिवशी व्हीआयपी प्रवेशावर बंदी घातली आहे.
सरकारच्या निर्णयामुळे कुंभमेळा परिसरात बाहेरील वाहने देखील प्रवेश करू शकणार नाहीत. महाकुंभ मेळ्यातील प्रमुख सहा स्नानांपैकी तीन स्नाने झाली असून उर्वरित तीन बाकी आहेत. यामध्ये वसंत पंचमी, माघी पौर्णिमा, महाशिवरात्री आहेत. या प्रमुख स्नान उत्सवादरम्यान महाकुंभात व्हीआयपींवर बंदी घातली आहे. सामान्य भाविकांच्या सोयीसाठी योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सर्व महत्त्वाच्या तारखांना आणि त्यांच्या एक-दोन दिवस आधी व्हीआयपी व्यक्तींच्या आगमनावर बंदी असणार आहे. कुंभमेळ्याच्या परिसरात केवळ कारच नाही तर सायकलींवरही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, वसंत पंचमी स्नान उत्सवाच्या तयारीसंदर्भात महाकुंभात एक मोठी बैठक झाली. डीजीपी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी फेअर ऑथॉरिटी कार्यालयात एक मोठी बैठक घेतली. वसंत पंचमी उत्सवानिमित्त संगम घाटापासून सर्व स्नान घाटांवर आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात संगम घाटावर रात्रीच्या विश्रांतीवर बंदी घालण्याचाही समावेश आहे.
हे ही वाचा :
यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल
हमासकडून सहा महिन्यांनंतर लष्करी नेता मोहम्मद डिफच्या मृत्यूची पुष्टी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!
मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम कोसळले; जीवितहानी नाही
स्नानानंतर भाविकांना संगम घाट ताबडतोब रिकामा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. घाटांवर एकाच वेळी मोठी गर्दी जमवू नये अशा सूचना देण्यात आल्या. डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत डीएम महाकुंभ आणि डीआयजी महाकुंभ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. २०१९ च्या कुंभमेळ्यात डीएम असलेले भानुचंद्र गोस्वामी देखील बैठकीला उपस्थित होते.
प्रमुख स्नान :
१. १३ जानेवारी २०२५ – पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ – मकर संक्रांत
३. २९ जानेवारी २०२५- मौनी अमावस्या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ – वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ – माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ – महाशिवरात्री