रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला ‘हनीमून बेडरूम’चा लूक

रेल्वेची कारवाई, डेकोरेटरवर गुन्हा, कर्मचाऱ्याचे निलंबन

रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला ‘हनीमून बेडरूम’चा लूक

सोशल मीडियावर ‘सुहागरात एक्सप्रेस’ म्हणून व्हायरल झालेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या एका व्हिडिओनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. नवविवाहित जोडप्यासाठी फर्स्ट एसी डब्ब्याला फुले, फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि फेरी लाईट्सने बेडरूमसारखा सजवण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने संबंधित तिकीट तपासनीस (टीसी/टीटीई) याला निलंबित केले असून, सजावट करणाऱ्या डेकोरेटरविरोधातही रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, ६ जुलै रोजी मुंबईकडे येणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी डब्ब्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याने खासगी डेकोरेटरची ऑनलाइन सेवा घेतली होती. संबंधित डेकोरेटरला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर संपूर्ण डब्ब्याची सजावट हॉटेलमधील ‘हनीमून सूट’प्रमाणे करण्यात आली. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली.
हे ही वाचा:
पीओके पुन्हा पेटणार? पाकिस्तान सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम

विषारी कीटक चावल्याने अभिनेते राजेश शर्मांना गंभीर संसर्ग

घसरणीनंतर बाजाराची दमदार मुसंडी; सेन्सेक्स २३८ अंकांनी वधारला

बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस अमानुष छळ

दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले की, कोणत्याही बाहेरील व्यक्तीला परवानगीशिवाय रेल्वेच्या एसी डब्यात प्रवेश देणे हा अत्यंत गंभीर सुरक्षा भंग आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले असून संपूर्ण घटनेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

या घटनेमुळे रेल्वेच्या प्रवासी सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर काहींनी या अनोख्या कल्पनेचे कौतुक केले असले, तरी बहुतांश नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचा खासगी समारंभासाठी वापर आणि सुरक्षा नियमांकडे झालेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनानेही हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.

Exit mobile version