केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्षाचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी ईशान्येकडील आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी केले आहे. अभाविपने आयोजित ईशान्येकडील विद्यार्थी आणि युवा संसदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, “भाजप सरकारचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी ईशान्येकडील आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी केले आहे. २०२७ पर्यंत, ईशान्येकडील प्रत्येक राजधानी रेल्वे, विमान आणि रस्त्याने जोडली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय भाजप सरकारच्या काळात ईशान्येकडील हिंसाचारात लक्षणीय घट झाल्याचेही ते म्हणले.
२००४ ते २०१४ दरम्यान झालेल्या ११,००० घटनांवरून २०१४ ते २०२४ दरम्यान हिंसाचाराच्या घटनांची संख्या ७० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, सुरक्षा दलांच्या मृतांची संख्या ७० टक्क्यांनी कमी झाली आहे, तर गेल्या दशकात नागरिकांच्या मृत्यूंमध्ये ८९ टक्क्यांनी घट झाली आहे. मेळाव्याला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, “मणिपूरमधील हिंसाचार वगळता ईशान्येकडील भागात आज पूर्ण शांतता आहे. २००४ ते २०१४ पर्यंत हिंसाचाराच्या एकूण ११,००० घटना आणि २०१४ ते २०२४ पर्यंत ३,४२८ घटना घडल्या, म्हणजेच ७० टक्क्यांनी घट झाली आहे. सुरक्षा दलांच्या मृत्यूच्या संख्येतही ७० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या १० वर्षांत नागरिकांच्या मृत्यूच्या संख्येत ८९% घट झाली आहे.”
हे ही वाचा..
अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही
रान्या राव सोने तस्करी: प्रोटोकॉल उल्लंघन आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश
सोने तस्करी प्रकरणात अट्रिया हॉटेल मालकाच्या नातवाला अटक
बघेल यांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर गोंधळ घालणे योग्य नाही
ईशान्येकडील भाग आज शांतता अनुभवत आहे. मेघालय, अरुणाचल, आसाम, नागालँड किंवा मिझोराम असो, आम्ही सर्व सशस्त्र गटांसोबत करार केले आहेत आणि १०,५०० हून अधिक बंडखोरांनी शस्त्रे टाकली आहेत आणि मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. आमच्या सरकारने १० वर्षांत १२ महत्त्वाचे करार केले आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, शांततेशिवाय कोणतेही राज्य प्रगती करू शकत नाही आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने या प्रदेशात स्थिरता आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, सर्व पंतप्रधानांनी ईशान्येला (आसाम वगळता) एकत्रितपणे फक्त २१ भेटी दिल्या आहेत, तर एकट्या नरेंद्र मोदींनी ७८ भेटी केल्या आहेत, यावरून सध्याचे सरकार या प्रदेशाला किती महत्त्व देते हे दिसून येते, असं अमित शाह म्हणाले.