डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखेवर दगडफेक करणाऱ्याची ओळख पटविण्यात आली आहे. टिळक नगर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे, पाच जणांमध्ये ४ जण विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) असून रिजवान शेख (१८ ) याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून इतर चौघांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी दिली आहे.
डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा येथे असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडून जवळच असणाऱ्या मैदानात लहान मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण देण्यात येते, हे प्रशिक्षण मागील काही आठवड्यापासून सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान दिले जाते. रविवारी रात्री या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण दिले जात असताना त्यांच्यावर अचानक दगडांचा मारा करण्यात आला. मोठंमोठे दगड प्रशिक्षण घेणाऱ्यावर फेकण्यात आले. या दगडफेकीत कोणालाही इजा झालेली नसली तरी हा प्रकार गंभीर असल्यामुळे या घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली.
टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हल्ला करण्यात आलेले दगड ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज ताब्यात घेऊन तपासले असता, दगडफेक करणाऱ्याची ओळख पटवून पाच जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. दगडफेक करणारे मुस्लिम समाजाचे असून त्यापैकी ४ जण अल्पवयीन असून रिझवान शेख हा १८ वर्षाचा आहे. पोलिसांनी रिझवान याला या गुन्ह्यात अटक केली असून इतर विधी संघर्ष बालकांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बलिया मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिम नको, त्यांच्यासाठी वेगळी इमारत बांधा!
बघेल यांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर गोंधळ घालणे योग्य नाही
उत्तर प्रदेश: पोलीस आणि गो-तस्करांमध्ये चकमक, आरोपीच्या पायाला लागली गोळी!
पाकची नाचक्की; तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानच्या राजदूताला अमेरिकेत प्रवेश नाकारला
डोंबिवली पूर्वेत असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा तीन महिन्यांपासून शाखेचे अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे, जिथे मुले आणि इतर लोक प्रशिक्षण घेतात. दगडफेकी मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेच्या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ही शाखा परिसरातील मोकळ्या मैदानात चालवली जात होती.या घटनेनंतर, आरएसएसशी संबंधित लोक दगडफेक करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील आरएसएसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये ही घटना घडल्यामुळे पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली.