अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, भारताने अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांच्या प्रशासनाच्या अन्याय्य व्यापार पद्धती उघड करण्याच्या प्रयत्नांमुळे भारताने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, भारताने हे पाऊल उचलले कारण कोणीतरी अखेर त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश करत आहे. यानंतर आता भारताने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले की, भारताने अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही. यासंदर्भातील माहिती त्यांनी सोमवारी संसदीय समितीला दिली. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन त्यांच्या दाव्यावर बर्थवाल यांचे हे विधान आले आहे. परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय समितीला माहिती देताना, वाणिज्य सचिवांनी स्पष्ट केले की भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि कोणताही व्यापार करार अंतिम झालेला नाही.
बर्थवाल पुढे म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार कराराची चर्चा अजूनही सुरू असल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यांवर आणि माध्यमांच्या वृत्तांवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. भारताने अमेरिकेला व्यापार शुल्काबाबत काहीही वचनबद्धता दर्शवलेली नाही. शिवाय, व्यापार वाटाघाटी दरम्यान भारताच्या हितांची काळजी घेतली जाईल,” असेही त्यांनी सांगितले. भारत व्यापार विस्ताराला पाठिंबा देत असला तरी, शुल्क युद्ध कोणाच्याही हिताचे नाही आणि त्यामुळे मंदी देखील येऊ शकते, असंही ते म्हणाले. भारत, विशेषतः देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये, बिनदिक्कतपणे दर कमी करणार नाही. राष्ट्रीय हितसंबंध जपले जातील याची खात्री करण्यासाठी भारत बहुपक्षीय ऐवजी द्विपक्षीय पातळीवर दर कमी करण्यावर वाटाघाटी करण्यास प्राधान्य देतो, असे बर्थवाल यांनी समितीला सांगितले.
अमेरिकन व्यवसायांना नुकसान पोहोचवणाऱ्या व्यापार धोरणांवर बोलताना ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतासह आणखी काही देशांना परस्पर कर लागू करण्याचा इशारा दिला होता. “भारत आमच्याकडून प्रचंड शुल्क आकारतो. तुम्ही भारतात काहीही विकूही शकत नाही. तसे, त्यांनी मान्य केले आहे; ते आता त्यांचे शुल्क कमी करू इच्छितात कारण कोणीतरी अखेर त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश करत आहे,” असे ट्रम्प म्हणाले होते.
हे ही वाचा..
रान्या राव सोने तस्करी: प्रोटोकॉल उल्लंघन आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश
सोने तस्करी प्रकरणात अट्रिया हॉटेल मालकाच्या नातवाला अटक
बघेल यांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर गोंधळ घालणे योग्य नाही
भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना मुस्लिम जमावाचा हिंदूंवर हल्ला
तर, ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच अमेरिकन काँग्रेसला संयुक्त भाषणात सांगितले की, प्रत्येक देशाने आपल्याला अनेक दशकांपासून फसवले असून आम्ही ते आता होऊ देणार नाही. ते भारताला उद्देशून म्हणाले की, “भारत आमच्याकडून १०० टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारतो, चीनचा आमच्या उत्पादनांवर सरासरी शुल्क आमच्यापेक्षा दुप्पट आहे आणि दक्षिण कोरियाचा सरासरी शुल्क चार पट जास्त आहे. हे मित्र आणि शत्रू दोघांकडून घडत आहे. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही; ती कधीच नव्हती. २ एप्रिल रोजी परस्पर शुल्क लागू होईल. ते आमच्यावर कोणताही कर लावतील, आम्ही त्यांच्यावर कर लावू.”