उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील गुन्नौर भागात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलफाम सिंह यादव यांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी (१० मार्च) दोन दुचाकीस्वार हल्लेखोर भाजपा नेत्याच्या घरात घुसले आणि त्यांना इंजेक्शन देऊन पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते गुलफाम सिंह यादव त्यांच्या घरात एका खाटेवर बसले होते. याच दरम्यान दुचाकीवरून दोन तरुण घरात आले, यावेळी एका तरुणाच्या हातात इंजेक्शन होते. घरात शिरकाव करताच त्याने अचानक भाजपा नेत्याच्या पोटात इंजेक्शन टोचले आणि काही वेळ तिथेच उभे राहिले. यानंतर घरातील लोक बाहेर यायच्या आत दोघांनी दुचाकीस्वार तरुणांनी पळ काढला. त्यानंतर घाईघाईत, कुटुंबीयांनी भाजपा नेत्याला प्रथम जुनावरी येथील सरकारी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना अलीगढला रेफर केले आणि अलीगढला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
गुलफाम सिंग यादव हे एक अनुभवी राजकारणी होते जे तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय होते. २००४ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात गुन्नौर पोटनिवडणूक लढवली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांची पत्नी जावित्री देवी या तीन वेळा गावप्रमुख राहिल्या आहेत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी यांनी एससी-एसटी आरक्षणाला दिली मजबुती
पंजाब सरकार शिक्षणात आणते राजकारण
उत्तर प्रदेश: पोलीस आणि गो-तस्करांमध्ये चकमक, आरोपीच्या पायाला लागली गोळी!
पाकची नाचक्की; तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानच्या राजदूताला अमेरिकेत प्रवेश नाकारला
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि काही पुरावे गोळा केल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.