श्रीकांत पटवर्धन
एकसंध हिंदू समाज, हा विचार करताना आपल्या मनात हिंदुत्वाची व्याख्या अगदी स्पष्ट, तर्कशुद्ध आणि काटेकोर असणे गरजेचे आहे. इ.स. १९२२ -२३ च्या सुमारास, स्वा. सावरकर यांच्या “हिंदुत्व” या ग्रंथाचे हस्तलिखित अधिवक्ता वि.वि.केळकर यांच्या मार्फत नागपुरात डॉ. हेडगेवार यांच्या हाती लागले होते, त्यातील विचारांनी प्रभावित होऊन, पुढे त्यांनी रत्नागिरीत जाऊन सावरकरांची प्रत्यक्ष भेट ही घेतली होती. हिंदू संघटन कार्याची रूपरेषा तयार होताना त्यांच्या मनात साकारलेला हिंदुत्व विचार अगदी तोच होता, जो “हिंदुत्व” या ग्रंथात सावरकरांनी सविस्तर मांडलेला आहे.
पुढे द्वितीय सरसंघचालक पूज्य गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्या विचारधन (Bunch of Thoughts) या ग्रंथात मांडलेले विचारही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मांडणीशी मिळतेजुळते आहेत. विशेष म्हणजे त्यांनी “अंतर्गत आव्हाने / धोके” ( Internal Threats) या स्वतंत्र प्रकरणात मुस्लिम व ख्रिश्चन समाजाचा सखोल, सविस्तर विचार केलेला आहे.
“हिंदुत्व” या शब्दाची व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या १९२३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात केलेली आहे. ती अशी : “आसिंधू सिंधुपर्यंता यस्य भारत भूमिका I पितृभुः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः II”
हिंदुत्वाची इतकी समर्पक , निर्दोष, तर्कशुद्ध व्याख्या दुसरी कोणतीही उपलब्ध नाही. सिंधू नदीपासून , ते समुद्रापर्यंत , (अर्थात हिंदी महासागरापर्यंत) पसरलेल्या या विशाल भारत देशाला आदरयुक्त प्रेमाने आपली पितृभूमी तसेच पुण्यभूमी मानणारा, तो हिंदू. याखेरीज, आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 25(2) च्या उपखंड (ख ) मध्ये शीख, जैन व बौद्ध, हे त्या अनुच्छेदाचा अर्थ लावताना, “हिंदू” असल्याचे समजले जाईल, असे स्पष्ट नमूद आहे.
मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील व्यक्ती, जरी त्यांचे पूर्वज, वाडवडील, हे इथेच राहत आलेले असल्याने त्यांची “पितृभू” भारत मानीत असले, तरी त्यांची पवित्र स्थळे – मक्का, मदीना, व जेरुसलेम. Vatican city ही असल्याने त्यांची “पुण्यभू” या देशाला मानत नाहीत. अर्थात ते समाज हिंदुत्वाच्या व्याख्येच्या परिघात बसत नाहीत. उलट हिंदू व्यक्ती, हिंदू धर्मातील असंख्य पंथ, उपपंथांपैकी कोणत्याही उपशाखेची असली, तरी तिचे पूज्य, पवित्र स्थळ अगदी निःसंशयपणे या देशातच असते. त्यामुळे तिची पुण्यभू भारत देशच असतो.
एकसंधतेचा विचार करताना, हिंदू समाजातील कमालीची विविधता, विभिन्नता हे मोठे आव्हान समोर उभे राहते. विभिन्न भाषा, विभिन्न उपासना पद्धती, देवदेवता, व्रत वैकल्ये, सणवार, पंथ उपपंथाचे आचार्य, महंत इत्यादी. आठव्या शतकात श्रीमद् आद्य शंकराचार्य यांनी पंचायतन पूजा – विष्णू, शिव, देवी, गणपती आणि सूर्य, – या हिंदूंच्या पाच मुख्य उपास्य देवता; त्यांची एकत्र, सारख्याच आदराने केलेली नित्य पूजा – प्रचलित करून या भिन्न पंथांच्या समन्वयाचे धोरण जोमाने पुढे रेटले, आणि प्रस्थापित केले होते. सर्व संतांनी एकमुखाने “हरिहरामध्ये भेद नाही”, – हेच तत्त्व आग्रहाने मांडले आहे. हिंदू, मग तो कुठल्याही पंथाचा असला, तरी तो श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान शिव, देवी आणि गणपती यांना सामान्यतः मानतोच. त्याचप्रमाणे,
अयोध्या मथुरा माया …..काशी कांची अवंतिका …….पुरी द्वारावतीश्चैव…..सप्तैते मोक्ष दायिन्या:….II
हीच कोणाही हिंदूची पवित्र स्थळे, तीर्थक्षेत्रे असतात. आयुष्यात एकदा तरी काशी, रामेश्वर ची यात्रा घडावी, हीच कोणाही हिंदूची मनापासून इच्छा असते.अशा तऱ्हेने हिंदू धर्मातील विविधतेत जी एकता आढळते, तिच्यावर भर देऊन एकसंधता साधावी लागेल.
हिंदू समाजात एकसंधता रुजवण्यात दुसरा मुख्य वैचारिक अडथळा म्हणजे खुद्द भगवद्गीतेत मांडलेले चातुर्वर्ण्य. त्याविषयी बरेच गैरसमज आहेत, जे दूर करावे लागतील. आणि त्यासाठी, खुद्द गीतेतच सांगितलेल्या – “गुणकर्मविभागशः” – यावर पुरेसा भर द्यावा लागेल. म्हणजे, चार वर्ण, हे जन्माने ठरत नसून , व्यक्तीच्या गुण आणि कर्मानुसार ठरतात, हे लक्षात घ्यावे लागेल. जन्म कुठल्याही जातीत झाला, तरीही, मनुष्य आपल्या कर्माने श्रेष्ठ, मध्यम किंवा कनिष्ठ अवस्था प्राप्त करून घेतो, यावर जोर द्यावा लागेल. मुळात कुठलेही कर्म, जर ते प्रामाणिकपणे केले जात असेल, तर ते उच्च नीच नसतेच, नाहीच. ते कर्म यादृष्टीने सारखेच महत्वाचे असते. लोकमान्य टिळकांचे आपल्या मुलाच्या संदर्भातले उद्गार प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, “माझ्या मुलाने जोडे शिवले, तरी चालतील, पण त्याने बनवलेल्या जोड्यांच्या तोडीचे जोडे, महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाहीत, इतके उत्तम प्रतीचे असावेत, म्हणजे झाले. मला त्यात अभिमानच वाटेल ! “ म्हणजे केवळ अमुक एक विशिष्ट कर्म करणारा श्रेष्ठ, किंवा कनिष्ठ, असे नसून, त्या कर्माची गुणवत्ता – कर्त्याची योग्यता / पात्रता ठरवते; हे सर्वाना समजून घ्यावे लागेल. स्वा. सावरकरांच्या “हिंदुत्व” ग्रंथातही –
“शूद्रो ब्राह्मणतां एति ब्राह्मणः चेति शुद्र्ताम ”, तसेच – “न कुलं कुलामित्याहुः आचारं कुलमुच्यते “ अशा श्लोकांचा उल्लेख आहे. अर्थात, जात किंवा कुळ , हे जन्मावरून नव्हे, तर आचारावरून, कर्मांच्या गुणवत्तेवरून ठरते, असाच “गुणकर्मविभागशः” चा अर्थ आहे.
हा झाला हिंदू समाजाच्या एकसंधतेचा विचार. पण अहिन्दुंचे काय ?
आपल्या देशाच्या हजारो वर्षांचा इतिहास जरी क्षणभर बाजूला ठेवायचा म्हटले, तरी निदान १९४७ नंतरचा सत्तर वर्षांचा इतिहास तरी निश्चितच विचारात घ्यावा लागेल. फाळणी धार्मिक आधारावर झालेली असल्याने, खरेतर मुस्लिम समाजाला अल्पसंख्य म्हणून जे द्यायचे, ते १९४७ मध्येच – देशाचा एक तृतीयांश भाग कायमचा तोडून वेगळा करून – देऊन झाले आहे, असे समजण्यात काहीही चूक नाही. असे असताना फाळणी नंतरही त्यांना अल्पसंख्य म्हणून वेगळी वागणूक कशासाठी ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच योजना आयोगाचे पहिले उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांच्या सारख्यांनी फाळणी नंतर हिंदू मुस्लिम लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल तर्कशुद्ध भूमिकेतून सुचवली होती. पण तत्कालीन राजकीय नेतृत्वाने त्याकडे लक्षच दिले नाही.
आज फाळणी नंतरही इथे राहिलेला आपल्या एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ २०% असलेला मुस्लीम समाज हे एकूण राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्दिष्टासमोर एक मोठे आव्हान आहे.
१९४७ पासून आजवर पाकिस्तानने आपल्याशी फक्त शत्रुत्वच केले आहे. १९४८, १९६५, १९७१ व १९९९ अशी चार युद्धे पाकिस्तानची आपल्या देशाबरोबर झाली, ज्यात ते नेहमीच हरले. पण त्यांनी सीमापार घुसखोरी, दहशतवादी छुपे हल्ले, बॉम्बस्फोट, असंख्य केले, ज्यात हजारो निरपराध नागरिक मारले गेले. हे सर्व हल्ले, दहशतवादी कट , कारस्थाने ही स्थानिक मुस्लीम समाजाच्या सक्रीय सहभागाशिवाय (स्लीपर सेल्स) शक्य नव्हती. आज आपल्या देशात असे असंख्य दहशतवादी हल्ले करून फरार झालेले दावूद इब्राहीम , अझर मसूद, हाफिज सयीद …. सारखे गुन्हेगार पाकिस्तानात सुखाने राहत आहेत.
एकदा धार्मिक आधारावर फाळणी, उर्वरित भागात पुन्हा निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव, अल्पसंख्य तुष्टीकरण, मग पुन्हा काही ठिकाणी त्यांची बहुसंख्या झाल्याने धार्मिक फाळणी – हे दुष्टचक्र अत्यंत देश विघातक आहे, त्याला कुठेतरी कठोरपणे थांबवावेच लागेल. धार्मिक आधारावर एकदा फाळणी झाल्या नंतर उर्वरित देश हिंदूंचा हे अत्यंत तर्कशुद्ध म्हणून मान्य व्हावेच लागेल.
हे ही वाचा:
दाऊदचा निकटवर्ती डोला भारतात आला!
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराच्या घरावर टाकला बॉम्ब
उन्हाळ्याचा सुपरस्टार ‘कैरीचं पन्हं’
तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का
सशक्त भारताच्या ध्येयासाठी नुसता हिंदू समाज एकसंध असणे पुरेसे नाही, तर १९४७ नंतर प्रचंड संख्येने इथे राहिलेला मुस्लिम समाज हे एकसंधतेला महत्वाचे आव्हान आहे. साध्या भारत पाक क्रिकेट सामन्यात पाकिस्तान जिंकत असताना जे टाळ्या वाजवतात, त्यांच्या निष्ठा कुठे आहेत, हे शोधत बसण्याची गरज नाही.
या मुस्लीम समाजाला अजूनही शरियत आधारित ब्रिटीश कालीन मुस्लीम व्यक्तिगत कायदा लागू आहे. त्यातील कित्येक तरतुदी आपल्या राज्यघटनेतील मुलभूत हक्कांच्या विरोधी, विसंगत आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांना दुय्यम वागणूक, हलाला सारख्या अन्याय्य प्रथा, स्त्रियांना वारसा हक्कात समानता नसणे इत्यादी. गैरमुस्लिम लोकांना काफिर म्हणून हिणवून तुच्छतेची वागणूक देण्यास त्यांचे धर्मग्रंथ शिकवतात. त्यामुळे शरियत मानणारा मुस्लीम समाज भारतीय संविधानातील समानता, बंधुता व न्याय या तत्त्वांशी एकनिष्ठ राहू शकत नाही. उदाहरणार्थ, बालविवाह प्रतिबंधक कायदा मुस्लिमांना लागू नसल्याचे मुस्लीम मानतात, कारण शरियत मध्ये बालविवाहांना मान्यता आहे.
एकसंध समाज निर्माण करायचा, तर संपूर्ण समाज संविधानातील मुलभूत हक्क, आणि न्याय, समानता, बंधुता ही तत्त्वे मानणारा, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाराच असायला हवा. संविधानाशी एकनिष्ठा, ही भारतीय नागरिकत्वाची अट असायला हवी.







