स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून १० दिवसीय “यूपी ट्रेड शो–स्वदेशी मेला २०२५” चे आयोजन नोएडा हाट, सेक्टर-३३A येथे सुरू झाले आहे. हा मेला केवळ उत्तर प्रदेशातील शिल्पकार, कारागीर आणि स्थानिक उद्योजकांना त्यांची कला आणि उत्पादने सादर करण्यासाठी मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देत नाही, तर इतर राज्यांतील कलाकारांनाही त्यांच्या कलेचे दर्शन घडविण्याची संधी मिळत आहे. राज्य सरकारतर्फे आयोजित हा स्वदेशी मेला पारंपरिक उत्पादनांची ओळख वाढविण्याचे माध्यम ठरत असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक प्रभावी पाऊल मानले जात आहे.
मेळ्यात बिहारची मधुबनी पेंटिंग, तसर सिल्क, खादी कॉटन, आणि चंदेरी वस्त्र यांसारखी पारंपरिक हस्तकला आणि कापडं आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. मेळ्यात सहभागी झालेल्या मधुबनी कलाकारांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की या पारंपरिक उत्पादनांवरील जीएसटी कमी करावा, जेणेकरून त्यांना बाजारात योग्य दर मिळू शकेल. त्यांचे म्हणणे आहे की, जर सरकारला खरंच या हस्तकला जागतिक स्तरावर नेायच्या असतील, तर कलाकारांना विशेष पॅकेज, अनुदान किंवा करसवलती सारख्या सुविधा द्यायला हव्यात. तसर सिल्क उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या उद्योजिका शालिनी यांनी सांगितले, “आम्ही येथे व्यापार करण्यासाठी नाही, तर कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहोत. आमच्या स्टॉलवर ६०० रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंतची उत्पादने उपलब्ध आहेत. लोक या वस्तूंना केवळ वस्तू म्हणून नाही, तर एक सांस्कृतिक वारसा म्हणून पाहत आहेत.”
हेही वाचा..
आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई
लाहोरमध्ये टीएलपी निदर्शकांवर पोलिसांचा अंदाधुंद गोळीबार; ११ जण ठार
तालिबान नेत्याच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बंदी
मेळ्यात येणाऱ्या अभ्यागतांना पारंपरिक उत्पादनांची खरेदी करण्याबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत विविध जिल्ह्यांतील लोककलावंत त्यांचे सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत. स्वदेशी मेला २०२५ हे केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण नाही, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेच्या पुनर्जागरणाचे प्रतीक बनले आहे. या उपक्रमामुळे उत्तर प्रदेशातील हस्तकला आणि कारागिरांना केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवी ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







