33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषकासवांबरोबर वेळास गावही 'नॉट' रिचेबल

कासवांबरोबर वेळास गावही ‘नॉट’ रिचेबल

पाचही कासवांचा संपर्क तुटला

Google News Follow

Related

अरबी समुद्रातील कासवांचा अधिवास आणि त्यांचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी पाच कासवांना सॅटेलाइट टॅग लावून त्यांना कोकणातील समुद्रात सोडण्यात आले होते. सध्या या पाचही कासवांचा संपर्क तुटला आहे.

वनविभाग आणि कांदळवन कक्षाने या वर्षीच्या सुरुवातीला प्रथमा, श्रावणी, रेवा, लक्ष्मी आणि वनश्री या पाच कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करून त्यांना समुद्रात सोडले होते. सध्या एकेक करून या पाचही कासवांचा संपर्क तुटलेला आहे. या कासवांना सॅटेलाइट लावून प्रथम ज्या गावातून श्रीगणेशा झाला ते गाव म्हणजे ज्याला कासवाचं गाव म्हणून ओळखले जाते ते ‘वेळास’. या गावाची सध्याची स्थितीही अगदी अशीच या कासवांसारखी असते, अगदी ‘नॉट रिचेबल’.

वेळास हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे निसर्गरम्य कोकणी गाव. रत्नागिरी जिल्ह्याची सुरुवात याच गावाने होते. नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. या गावाला अथांग सागरी किनारा लाभला आहे. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या काही वर्षात वेळासचा समुद्रकिनारा प्रसिद्धी झोतात आला, तो ऑलिव्ह रिडले या कासवांमुळे. त्यामुळे पर्यटकांची कासवे पाहण्यासाठी चांगलीच वर्दळ या वेळासमध्ये दरवर्षी असते. एकेकाळी दुर्लक्षित असलेले गाव केवळ तिथे येणाऱ्या कासवांमुळे कसे प्रसिद्ध होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेळास.

दरवर्षी वेळासला कासव महोत्सव भरवला जातो. ऑलिव्ह रिडले कासवांच्या इवल्याशा पिल्लांना अरबी समुद्रात सोडण्याचा सोहळा पाहायला पर्यटक मंडळी वेळासला भेट देतात. आधीच आडवळणावर असलेले वेळास गाव कासव संवर्धनाच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर झळकले असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानापासून ते अजूनही वंचित आहे. या गावात कुठल्याही कंपनीचा मोबाइल टॉवर नाही. जो टॉवर आहे तो बाणकोट येथे आहे. परंतु वेळास हे गाव डोंगराच्या कुशीत असल्याने पर्यटकांशी मोबाइलवर संपर्क होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पर्यटक पर्याय म्हणून हरिहरेश्वर येथे राहण्यास पसंती देत असल्याने येथील स्थानिकांच्या रोजगारावर याचा फटका बसत आहे. वेळासमध्ये मोबाइल टॉवर उभारावेत, अशी अनेकदा मागणी करण्यात आलेली आहे; परंतु त्याकडे काणाडोळा करण्यात आला.

वेळासला कासव पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात. वेळास येथे लॉजिंग-बोर्डिंगवाले एकही हॉटेल नाही. पर्यटकांना येथे घरगुती व्यवस्था केली जाते. कित्येक वर्ष हे असेच चित्र आहे. या गावात सुमारे ४० हून अधिक घरांमध्ये जेवण व राहण्याची व्यवस्था आहे. परंतु संपर्क होत नसल्याने या रोजगारालाही सध्या खीळ बसली आहे. याचे मुख्य कारण वेळास ते हरिहरेश्वर यांना जोडणाऱ्या पूलाचे काम सध्या सुरू आहे. कित्येक वर्ष हे काम सुरू असूनही त्याची परिस्थित जैसे थे आहे. त्यात कोणताही फरक होताना दिसत नाही. परिणामी या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची अवस्था अगदी दयनीय झाली आहे. बाणकोट ते वेळास हे अंतर कापताना तुम्हाला रस्ता कुठे आहे हे शोधावे लागते. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी पर्यटकांच्या वाहतुकीलाही याचा फटका बसला आहे.

हे ही वाचा : 

परवानगीशिवाय फोटो काढत असाल तर होऊ शकते अटक

मुल दत्तक देण्याच्या नावावर जोडप्याला लुबाडले

चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर ते बेकायदेशीर चर्च पाडण्यात आले

अतिसुंदर; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान

ज्यांना समुद्रकिनारी निवांत फिरायला, हिंडायला आवडतं, अशा पर्यटकांसाठी कासव महोत्सव एक पर्वणीच आहे. वेळासला राहण्यासाठी संपर्क करत आहात. फोन लागत नाहीये. काही काळजी करू नका. जरी प्रथमा, श्रावणी, रेवा, लक्ष्मी आणि वनश्री यांचा जरी संपर्क तुटला असला तरी त्यांचे असंख्य नातलग तुमच्या भेटीला येणार आहेत. वेळासकर तुमच्या येण्याची अगत्याने वाट पाहत आहेत. डायरेक्ट गावात जा तुमची राहण्याची सोय गावकरी नक्की करतील. येथे पर्यटक गावपण अनुभवतात आणि इवल्याशा कासवांच्या समुद्रप्रवासाचा प्रारंभ अनुभवतात. गावकरी या पर्यटकांचे आदरातिथ्य मनापासून करतात. सुरूच्या बनामधून पावले थेट मऊ मुलायम रेतीकडे धाव घेत कासवांच्या पिल्लांसाठी तरी वेळासच्या किना-यावरून येणा-या गाजेला साद द्यायला हरकत नाही. येवा कोकण आपलाच असा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा