ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे. पुण्यात राहत्या घरी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला होता. त्यांचे वडील हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच त्यांच्या मातोश्री या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. पुढे उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी अनेक उपाधी प्राप्त केल्या.
नारळीकर हे १९७२ साली भारतात परतले आणि त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांनी भूषवले होते.
हे ही वाचा:
“अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का नाही?”
तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीचा परवाना का रद्द केला? भारत सरकारने स्पष्ट केलं कारण
मशीद समितीला दणका! संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
‘ऑपरेशन सिंदूर’ वर वादग्रस्त टिप्पणी; अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खानला अटक
चार दशकाहून अधिक काळ त्यांनी खगोलशास्त्र क्षेत्रात संशोधन केले. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहित असत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावे म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण, २००४ मध्ये पद्मविभूषण आणि २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.







