भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विजयासाठी आवश्यक चार धावा चौकार मारत वसूल केल्या आणि आपले वनडेतील ५१वे शतकही पूर्ण केले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या बहुचर्चित सामन्यात सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळविला. या पराभवामुळे पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणले.
दुबईत झालेल्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते कारण ही लढत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान या दोन संघांमधील होती. भारताने ही लढत जिंकलीच पण विराटने विक्रमी खेळी करून त्या विजयाची झळाळी अधिक वाढविली. विराटने वनडे क्रिकेटमधील आपल्या १४ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. ही कामगिरी करणारा तो वेगवान भारतीय फलंदाज ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्याने मागे टाकले. त्याशिवाय, विराट आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी रचत या विजयाचा पाया भक्कम केला.
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने ४६ धावांची खेळी केली. त्याने विराटसह दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. पण शुभमनची ही खेळी अब्रार अहमदने त्याला त्रिफळाचीत करत थांबविली. मात्र नंतर विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी करत भारताचा विजय टप्प्यात आणला.
त्याआधी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना ५० षटके पूर्ण खेळता आले नाही. २४१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. त्यात सौद शकीलची ६२ धावांची खेळी आणि कर्णधार मोहम्मद रिझवानच्या ४६ धावा यांचा समावेश होता. पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीला हादरे देण्याचे काम हार्दिक पंड्याने केले तर बाकी फलंदाजांवर अंकुश ठेवला तो कुलदीप यादवने. त्याने तीन फलंदाजांना टिपले. हर्षित राणा, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला. खुशदील शहाने ३८ धावांची खेळी केली नसती तर पाकिस्तानला २०० धावा करणेही मुश्किल झाले असते.
हे ही वाचा:
बागेश्वर धाम: पंतप्रधान मोदी म्हणाले, श्रद्धेचे केंद्र आता आरोग्याचे केंद्र बनणार!
तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…
संभलमध्ये आता ३०० ‘डोळे’ चौफेर लक्ष ठेवणार!
महाकुंभ : २६ फेब्रुवारीला शेवट, ६० कोटींहून अधिक भाविकांचे स्नान!
विराटने या सामन्यात वनडे क्रिकेटमधील आपला १५७ वा झेलही पकडला.
भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला दिलेली मात आणि पाकिस्तानवर मिळविलेला विजय यासह चार गुण मिळविले आहेत. भारत सध्या तक्त्यात वरच्या क्रमांकावर आहे. अर्थात, भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पाकिस्तानचे मात्र सलग दोन पराभव झाले आहेत. पहिला सामना त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध गमावला तर आता भारताने त्यांना नमवले. २७ फेब्रुवारीला त्यांची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. त्या सामन्यातील कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास भारत ४ गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंड एका विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तानचे खाते अद्याप उघडलेले नाही. दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकेक सामना जिंकला आहे. तर इंग्लंड, अफगाणिस्तान यांनी एक सामना गमावला आहे.