तिबेटचे आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, त्यांच्या मृत्यूनंतरही दलाई लामांच्या संस्थेचे अस्तित्व कायम राहील. तसेच, त्यांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार गदेन फोडरंग ट्रस्टकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गदेन फोडरंग ट्रस्ट ही संस्था तिबेटी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि तिबेटी जनतेसह इतर गरजू लोकांना, त्यांच्या राष्ट्रीयता, धर्म किंवा पार्श्वभूमीची पर्वा न करता, मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे.
धर्मशाळेजवळ मॅक्लिऑडगंज येथे सुरु झालेल्या तीन दिवसीय बौद्ध धार्मिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दलाई लामा बोलत होते. त्यांनी सांगितले, “२४ सप्टेंबर २०११ रोजी तिबेटी आध्यात्मिक परंपरांचे प्रमुख लामांशी झालेल्या बैठकीत, देशांतर्गत व परदेशात राहणाऱ्या तिबेटीयन नागरिकांपुढे हे स्पष्ट केलं होतं की, दलाई लामा ही संस्था पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दलाई लामा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, त्यांच्या पुनर्जन्माची मान्यता देण्याचा अधिकार केवळ गदेन फोडरंग ट्रस्टकडेच असेल.
हेही वाचा..
”संसद हल्ला”, न्यायालयाकडून आरोपींना नाकदाबून जामीन!
६ जुलै रोजी ९० वर्षांचे होणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते दलाई लामा यांनी परिषदे दरम्यान सांगितले की, १९६९ मध्येच त्यांनी म्हटलं होतं की, दलाई लामांचा पुनर्जन्म सुरू ठेवायचा की नाही, हे तिबेटी जनतेने व संबंधित समुदायांनी ठरवावं. तसेच, वयाच्या ९० व्या वर्षी या संदर्भात तिबेटी बौद्ध परंपरेचे प्रमुख लामांशी, तिबेटी जनतेशी व बौद्ध अनुयायांशी चर्चा करतील, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या १४ वर्षांमध्ये तिबेटी आध्यात्मिक नेत्यांनी, निर्वासित तिबेटी संसद, केंद्रीय तिबेटी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हिमालयीन क्षेत्र, मंगोलिया, रशियातील बौद्ध गणराज्य आणि चीनमधील बौद्ध अनुयायांनी त्यांना पत्र लिहून दलाई लामा संस्थेच्या सातत्याची विनंती केली. विशेषतः तिबेटमध्ये राहणाऱ्या लोकांनीही विविध माध्यमातून हीच मागणी केली. या सर्व गोष्टींचा विचार करून दलाई लामा यांनी त्यांची संस्था भविष्यकालातही चालू ठेवण्याचा निर्णय निश्चित केला.
२०११ मध्ये दिलेल्या निवेदनानुसार, भविष्यातील दलाई लामाला मान्यता देण्याची जबाबदारी केवळ त्यांच्या कार्यालयावर आणि गदेन फोडरंग ट्रस्टवर असेल, हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. दलाई लामा यांनी पुनर्जन्म प्रक्रियेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, ही प्रक्रिया तिबेटी बौद्ध परंपरेनुसार प्रमुख लामांच्या आणि शपथबद्ध धर्म रक्षकांच्या सल्ल्यानुसारच पार पडेल. ही प्रक्रिया दर्शन, संकेत व आध्यात्मिक विधी यांवर आधारित असेल, जशी की पारंपरिक तिबेटी पद्धतीत प्रचलित आहे. त्यांनी हेही ठासून सांगितलं की, दलाई लामांचा पुनर्जन्म ‘नियुक्त’ केला जात नाही, तो एक पवित्र आध्यात्मिक प्रक्रिया असते, ज्यातून ओळख पटते. या प्रक्रियेत फक्त दलाई लामा स्वतःच आपल्या उत्तराधिकारीची ओळख करू शकतात.
