१३ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (२ जुलै) जामीन मंजूर केला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. २००१ च्या संसद हल्ल्याच्या ‘भयानक आठवणी’ पुन्हा जिवंत करण्याचा आरोपींचा हेतू होता, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला होता. तथापि, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने दोघांनाही ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामिनाच्या अटींचा एक भाग म्हणून, न्यायालयाने आरोपींना मुलाखती देण्यास किंवा प्रकरणाशी संबंधित कोणतेही सार्वजनिक विधान करण्यास मनाई आणि त्यांना या घटनेशी संबंधित सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यास मनाई केली आहे.
न्यायालयाने त्यांना दिल्ली शहर सोडण्यासही बंदी घातली आहे आणि दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी १० वाजता नियुक्त केलेल्या पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने २१ मे रोजी राखीव ठेवलेला आदेश दिला.
हे ही वाचा :
मध्य प्रदेश भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हेमंत खंडेलवाल यांची बिनविरोध निवड, आज औपचारिक घोषणा
रेल्वेमंत्र्यांनी ‘रेलवन’ अॅप केले लाँच, प्रवाशांच्या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर
खरं तर, १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याची एक मोठी घटना समोर आली. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही हा दिवस होता. लोकसभेत शून्य प्रहरात, सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात पिवळा वायू सोडला आणि घोषणाबाजी केली. लोकसभेत उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांना नियंत्रित केले. त्याच वेळी, इतर दोन आरोपी अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांनी संसदेच्या परिसराबाहेर रंगीत वायू फवारला आणि घोषणाबाजी केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ललित झा आणि महेश कुमावत या दोन अन्य आरोपींना अटक केली.
