पंजाबचे माजी मंत्री बिक्रमसिंग मजीठिया यांच्या अटकेने राज्यातील राजकारण पेटलं आहे. अमलीपदार्थ प्रकरण आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रमसिंग मजीठिया यांना अटक करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी आरोप केला की, मजीठिया यांच्या समर्थनार्थ मोहालीला जाणाऱ्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांनी पंजाब सरकारवर “अघोषित आणीबाणी” लादल्याचा आरोप केला आहे.
सुखबीर सिंग बादल यांनी बुधवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिलं : “भगवंत मान यांनी पंजाबमध्ये अघोषित आणीबाणी लादली आहे. आम आदमी पार्टी सरकारकडून खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलेल्या बिक्रमसिंग मजीठिया यांच्या समर्थनार्थ आज मोहालीला निघालेल्या अकाली कार्यकर्त्यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. प्रमुख रस्त्यांवर नाके लावून त्यांना रोखण्यात येत आहे. या प्रकारच्या दडपशाहीची ही कृती भ्याडपणाचं लक्षण आहे.”
हेही वाचा..
मध्य प्रदेश भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हेमंत खंडेलवाल यांची बिनविरोध निवड, आज औपचारिक घोषणा
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री भगवंत मान मजीठिया यांच्यासाठी वाढत असलेल्या जनसमर्थनाने घाबरले आहेत. मी स्पष्ट सांगतो की अकाली दल आणि त्याचे कार्यकर्ते अशा दडपशाहीने घाबरणार नाहीत. यापूर्वीही अकाल्यांनी जनआंदोलनांच्या माध्यमातून दडपशाहीला विरोध केला आहे. आता देखील आम्ही पंजाबच्या जनतेच्या पाठबळावर भ्रष्ट आणि हुकूमशाहीवादी आम आदमी पार्टी सरकारला योग्य धडा शिकवू.”
बिक्रमसिंग मजीठिया यांना आज (बुधवार) कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना २६ जून रोजी अटक करण्यात आली होती, आणि त्यानंतर २ जुलैपर्यंत रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. आज त्यांचा रिमांड कालावधी संपत असल्याने कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अकाली दलाचे नेते मोहालीकडे निघाले होते, मात्र त्यांना तिथे जाण्याची परवानगी सध्या देण्यात आलेली नाही.
