भारताने सिंधू पाणी करार (IWT) स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या तीन प्रमुख भागातील नद्यांचा पाण्याचा प्रवाह २० टक्क्याने कमी झाला आहे. २३ एप्रिल रोजी सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर भारताने पाण्याचा प्रवाह नियंत्रित केल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच तीव्र झाले आहे. पाकिस्तानला आता मान्सूनपासून आराम मिळण्याची आशा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २० जून रोजी पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्क्याने पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. भारत ‘सिंधू’ आणि ‘चिनाब’ नद्यांचे पाणी बियास नदीशी जोडण्याची आणि गंगासागरपर्यंत १६० किमी लांबीचा बोगदा बांधण्याची योजना आखत आहे. यामुळे पाकिस्तानसाठी परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते.
सीएनएन-न्यूज१८ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या खरीप पिकांसाठी हे विशेषतः चिंताजनक आहे. भारताच्या पावलांमुळे खरीप हंगामात २१ टक्के पाणीटंचाई निर्माण होईल अशी भीती पाकिस्तानला आधीच होती. नवीन आकडेवारीवरून असे दिसून येते की ही कमतरता जवळजवळ त्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. २० जून रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशात पाण्याचा प्रवाह १,१०,५०० क्युसेक आहे, जो गेल्या वर्षी १,३०,८०० क्युसेक होता. त्याचप्रमाणे, सिंधमध्ये पाण्याचा प्रवाह १,३३,००० क्युसेक आहे, जो गेल्या वर्षी १,७०,००० क्युसेक होता. खैबर पख्तुनख्वामध्ये पाण्याचा प्रवाह २,६०० क्युसेक आहे, जो गेल्या वर्षी २,९०० क्युसेक होता.
हे ही वाचा :
ट्रम्प देणार पाकिस्तानला एफ-३५?
तंत्रज्ञान, विविध योजनांमुळे कृषिक्षेत्राला मिळाले नवचैतन्य
पंतप्रधान मोदींसोबत पाच लाख लोक करणार योगा!
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
गेल्या महिन्यात पाकिस्तानने म्हटले होते की चिनाब नदीला पाणीपुरवठा कमी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे संकट निर्माण झाले आहे. यामुळे खरीप हंगामात पाण्याची कमतरता निर्माण होईल. पाकिस्तानने आतापर्यंत भारताला चार पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमध्ये पाकिस्तानने भारताला सिंधू पाणी करार थांबवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबेपर्यंत आणि ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’ तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
