व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे स्नेह भोजन झाले. या भेटीत नेमके काय शिजले याचा तपशील अनेक प्रतिष्ठित माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेला आहे. पाकिस्तानला शस्त्रसज्ज करण्याचे गाजर अमेरिकेने दाखवले आहे. त्यांच्याकडे असलेले अव्वल संरक्षण तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्याची तयारी दाखवलेली आहे. यात अमेरिकी संरक्षण तंत्रज्ञानाचा जिवंत अविष्कार असलेले एफ-३५ हे स्टेल्थ लढाऊ विमान जे अनेक NATO देशांना अमेरिकेने दिलेले आहे, त्याचा समावेश असू शकतो. ही तीच अदृश्य विमाने आहेत, जी इराणवर अग्निवर्षा करण्यासाठी वापरली जात आहेत. कोणत्याही करारात अटी शर्ती असतात, तशा या प्रस्तावातही आहेत. ट्रम्प यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहाता ते बेभरवशाचे आहेत. परंतु समजा ही लढाऊ विमाने पाकिस्तानला मिळालीच तर भारताची सुरक्षा कितपत धोक्यात येऊ शकते?
जगात स्टेल्थ लढाऊ विमाने बनवल्याचा दावा रशिया, चीन, तुर्कीये या देशांनीही केलेला आहे. परंतु रशियाची सु-५७, चीनची जे-३५ आणि तुर्कीयेची टीएफ, या पेक्षा आमचे एफ-३५ ही लढाऊ विमाने सरस असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. इराण विरुद्धच्या युद्धात एफ-३५ चा घाऊक वापर करण्यात आला. अमेरीकेकडे एफ-२२ रॅप्टर आणि बी-२ बॉम्बर ही स्टेल्थ आहेत. एफ-३५ चर्चा अशासाठी होते, की ही विमाने अमेरिकेने अनेक NATO देशांना विकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तेव्हा भारताला आम्ही एफ-३५ द्यायला तयार आहोत, अशी ऑफर अमेरिकेने न मागता दिली होती. भारताने याबाबत अजूनही मौन बाळगले आहे. एफ-३५ ऐवजी रशियाची सु-५७ घेण्याचा भारत विचार करीत असल्याची चर्चा आहे.
मुनीर यांना ट्रम्प यांनी संरक्षण तंत्रज्ञान आणि एफ-३५ देऊ केली असतील तर त्याच्या मोबदल्यात अमेरीकेला काय हवे हे स्पष्ट आहे. इराणचा काटा काढण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि चीनची साथ सोडण्याचे आश्वासन. अमेरिका खरोखरच पाकिस्तानला इतके घातक स्टेल्थ देऊ शकते का? यापूर्वी अमेरिकेने हे केलेले आहे. अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानला एफ-१६ दिले होते. हे विमान अन्य कोणत्याही देशाविरुद्ध वापरू नये अशी अट होती. अशा अटी नावापुरत्या असतात. भारताने बालाकोटचा हवाई हल्ला केला तेव्हा विगं कमांडर अभिनंदनने पाठलाग करणारे एफ-१६ अगदी भंगारात काढता येईल इतक्या जुन्या झालेल्या मिग-२९ या भारतीय लढाऊ विमानाने पाडले होते.
हवालदार अब्दुल हमीद यांनी १९६५ च्या युद्धात रिकॉईललेस रायफलने अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले अद्ययावत पॅटन रणगाडे उद्ध्वस्त केले होते. अर्थ स्पष्ट आहे. तुमच्याकडे कोणती शस्त्र आहेत, यापेक्षा तुमच्या जवानांच्या मनगटात किती बळ आहे आणि काळीज किती मजबूत आहे, हे युद्धकाळात महत्वाचे ठरते. देशाचे रक्षण करण्यापेक्षा जोड धंदे करून पैसे मिळवणे हा पाकिस्तानी लष्कराचा मुख्य उद्योग बनला आहे. त्यात कर्मधर्म संयोगाने अमेरिकेच्या एफ-३५ ची पोलखोल सुद्धा झालेली आहे. मुळात ट्रम्प यांनी एफ-३५ चे दिलेले आश्वासन हे गाजर असण्याची शक्यता जास्त आहे. जरी ते प्रत्यक्षात आले तरी भारताला भय बाळगण्याचे कारण नाही.
आठवड्या पूर्वीची गोष्ट आहे. १४ जून रोजी ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या प्रिन्स ऑफ वेल्स जहाजावरील एफ-३५ बी हे विमान अरबी समुद्रात उड्डाण करत असताना अचानक केरळच्या थिरुअनंतपुरम विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले. खवळलेल्या समुद्रामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला, असे सांगून वैमानिकाने विमानतळाच्या नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली होती. विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रिन्स ऑफ वेल्स या जहाजावरून तात्काळ हेलिकॉप्टर आणि काही तंत्रज्ञ रवाना करण्यात आले.
घटनाक्रम लक्षात घ्या, १४ जूनच्या रात्री ९.२० वाजता ब्रिटीश वैमानिकाने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. विमानात बिघाड झाल्याचे सांगून विमान उतरवण्याची परवानगी मागितली. हे विमान सुरक्षित खाली आले. विमानतळावर भारताकडून सर्वतोपरी मदत पुरवण्यात आली. खरी गंमत अशी आहे की, ब्रिटीश वैमानिकाने संपर्क करण्यापूर्वी दोन ते पाच मिनिटे आधीच भारताच्या इंटीग्रेटेड एअर कमांड एण्ड कंट्रोल सिस्टीमने (IACCS) हे विमान भारतीय हवाईक्षेत्राच्या सीमेवर असतानाच हेरले होते. हे स्टेल्थ विमान आपल्या हवाईक्षेत्रात प्रवेश करते आहे, हे कळल्यानंतरही त्यावर हल्ला करण्यात आला नाही, कारण ते शत्रूचे विमान नाही हेही आपल्या सुरक्षा यंत्रणेने हेरले होते. ही घटना साधी सोपी वाटत असली तरी ती अमेरिका-चीनसह जगातील अनेक बड्या देशांना हादरवणारी होती. कारण स्टेल्थ विमाने हेरण्याची क्षमता असलेली रडार यंत्रणा भारताकडे आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका सामील होणार?, ट्रम्प दोन आठवड्यात घेणार निर्णय!
व्हाईट हाऊसमधील शाही खान्याची किंमत काय?
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
उद्धवजी गरळ ओका, टोमणे मारा… पण जनतेची साथ महायुतीलाच!
भारताच्या दृष्टीने विचार करणाऱ्या तज्ज्ञांना असाही संशय आला की, कदाचित ही भारतासाठी ‘मिया चन्नू’ प्रकरणाची अमेरिकेने केलेली पुनरावृत्ती होती. ‘मिया चन्नू’ हे काय प्रकरण आहे, हे भारतीयांना चांगलेच ठाऊक आहे. २०२२ मध्ये हवाईदलाच्या अंबाला तळावरून एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र अचानक सुटले आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ‘मिया चन्नू’ या भागात जाऊ आदळले. हे क्षेपणास्त्र चार मिनिटे पाकिस्तानच्या हवाईक्षेत्रात होते. परंतु ना ते पाकिस्तानच्या रडार यंत्रणांना हेरता आले, ना ते पाकिस्तानला पाडता आहे. भारताने हे चुकून घडल्याचे दोन दिवसांनी मान्य केले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अशी उघड चर्चा होती की भारताने जाणीवपूर्वक ही चूक केली जेणे करून पाकिस्तानी रडार यंत्रणेला ब्रह्मोसचा माग काढता येतो की नाही ते स्पष्ट होईल.
‘मिया चन्नू’मध्ये भारताने केलेला प्रयोग एफ-३५ विमानांबाबत अमेरिकेने केला होता काय, अशी पुन्हा चर्चा होते आहे. खरोखरच हा प्रयोग असेल तर तो भारताच्या पथ्यावर पडला असण्याची शक्यता जास्त आहे. कारण एफ-३५ हे स्टेल्थ हेरण्याची क्षमता असलेली रडार यंत्रणा भारतात आहे, हे या निमित्ताने उघड झालेले आहे.
त्यामुळे पाकिस्तानला एफ-३५ देण्याची अमेरिकेची तयारी असली तरी भारताला भय बाळगण्याचे कारण नाही. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आपण पाकिस्तानकडे असलेल्या अमेरिकी एफ-१६ फायटर विमानांचा बाजार उठवला. तोच प्रकार एफ-३५ विमानांबाबत होण्याची शक्यता आहे.
अर्थात एफ-३५ देण्याची मेहरबानी करताना अमेरिकेने ठेवलेल्या अटी पूर्ण करणे पाकिस्तानला जमणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे. इराणविरुद्ध मदत तर अमेरिकेला हवी आहेच, शिवाय पाकिस्तानने चीनचा नाद पूर्णपणे सोडून अमेरिकेच्या बाजूला यावे ही अमेरिकेची मुख्य अट आहे. इराणच्या पाठीत खंजीर खूपसण्यासाठी तर पाकिस्तान तयार होईल, चीनचा हात सोडायला तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण चीन हा पाकिस्तानचा फक्त दाता नाही. शेजारी सुद्धा आहे. त्यामुळे बेभरवशाच्या ट्रम्प यांच्यासाठी चीनला सोडणे पाकिस्तानला परवडणार नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या टर्ममध्ये हेच ट्रम्प पाकिस्तानला म्हणाले होते की, आम्ही यांना दिलेला पैसा वाया गेला, मोबदल्यात आम्हाला फक्त फसवणूक आणि थापा मिळाल्या.
अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रसज्ज केले तर पुतीन यांनी मांडलेली भारत, चीन, रशिया एकत्र येण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल हे ट्रम्प यांनाही माहित आहे. त्यामुळे ते मुनीर यांनी दिलेली ऑफर म्हणजे कोपराला लावलेला गूळ आहे. मुनीर यांनाही ते ठाऊक आहे. अमेरिकी शस्त्रांनी भारताला रोखता येत नाही, हा पाकिस्तानचा अनुभव जुना आहे. त्यामुळे मुनीर-ट्रम्प यांच्या भेटीत जेवणावळीच्या पलिकडे काही साध्य होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. पाकिस्तानला पोतंभर डॉलर मिळतील फार फार तर.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
