आज (२० जून) दिल्लीतील काश्मिरी गेट येथील शिया जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. शिया जामा मशिदी काश्मिरी गेटचे इमाम मौलाना मोहसीन तकरीर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने लोकांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध निदर्शने केली. निदर्शनादरम्यान, लोकांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे चित्र आणि ‘आम्ही इराणसोबत उभे आहोत’ असे लिहिलेले फलक हातात घेतले होते.
शिया जामा मशिदीचे इमाम मौलाना मोहसीन तकरीर यांनी म्हटले, इराणवरील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आणि नेते अयातुल्ला अली खामेनी यांना जीवे मारण्याच्या धमक्यांविरोधात मशिदीच्या परिसरात निदर्शने करण्यात आली. नमाजानंतर मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. यावेळी इराण देशाचा झेंडा आणि भारताच्या झेंड्याचे पोस्टर देखील लोकांनी दाखवले.
दरम्यान, इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इस्रायली सैन्याने त्यांच्या अधिकृत निवेदनात या हल्ल्याची पुष्टी केली आहे, तर इराणी सरकारी माध्यमांनीही याचे वृत्त दिले आहे. इस्रायल संरक्षण दलांनी (आयडीएफ) सांगितले की, देशातील अनेक भागात सायरन वाजविण्यात आले आहेत. रॉयटर्सच्या मते, तेल अवीव आणि जेरुसलेमवर मोठ्या प्रमाणात स्फोट ऐकू येत आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.
इस्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) मते, इराणकडून इस्रायलवर अलिकडेच झालेल्या हल्ल्यात सुमारे २५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. यापैकी एक क्षेपणास्त्र हैफा येथे पडले, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले, ज्यात एका किशोरवयीन मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, दक्षिण आणि मध्य इस्रायलमध्येही क्षेपणास्त्र पडण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
हे ही वाचा :
ट्रम्प देणार पाकिस्तानला एफ-३५?
पंतप्रधान मोदींसोबत पाच लाख लोक करणार योगा!
तंत्रज्ञान, विविध योजनांमुळे कृषिक्षेत्राला मिळाले नवचैतन्य
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
दरम्यान, इस्रायल-इराणमध्ये या संघर्षात अनेकांचे जीव गेले आहेत. युद्धबंदीसाठी दोनही देशांनी हात वर केले आहेत. या युद्धात अमेरिका देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे. मात्र, व्हाईट हाउसने स्पष्ट केले आहे कि इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या सहभागाबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यांत निर्णय घेतील. त्यामुळे अमेरिका काय निर्णय घेईल याकडे सर्वांची नजर आहे.
