काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध वर्तमानपत्रात लेख लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कशी मॅचफिक्सिंग झाली असा गंभीर आरोप केला. त्यात निवडणूक आयोगानेच कसा घोळ घातला आहे, असा त्यांचा आरोप आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध वर्तमानपत्रात लेख लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
मुळात राहुल गांधी यांनी आपले हे सगळे आरोप करण्यासाठी वर्तमानपत्रातील लेखाचा पर्याय का निवडला? आता निवडणूक आयोग त्यांना म्हणत आहे की, त्यांचे जे आरोप आहेत, ते त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला पाठवावेत. पण तसे राहुल गांधी करण्याची शक्यता नाही. त्यांना या सगळ्याचा केवळ एक प्रपोगंडा करायचा आहे, असेच वाटते. त्यांनी पाच मुद्दे उपस्थित करत ही सगळी निवडणूक प्रक्रियाच सदोष आहे, असे म्हटले आहे.
यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखातून सविस्तर उत्तर दिले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित विचारवंत, बुद्धिवंत, पुरोगामी मंडळींनी विधवाविलाप सुरू केला आहे. त्यांची पोटदुखी ही आहे की, फडणवीसांनी राहुल गांधी यांच्या या लेखात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरच का द्यावे? ते काम निवडणूक आयोगाचे आहे, निवडणूक आयोगानेच त्याला उत्तर दिले पाहिजे. मुळात निवडणूक आयोगाने याला उत्तर दिले आहे. पण याचा अर्थ राहुल गांधी यांच्या लेखाला बाकी कुणीच उत्तर देऊ नये असा नाही. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असल्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या आणि जनतेच्या आशीर्वादामुळे सत्तेत आलेल्या पक्षाच्या नेत्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहेच. केवळ मुख्यमंत्री किंवा एखाद्या पक्षाचा नेताच कशाला, प्रत्येक नागरिकाला राहुल गांधी यांच्या या लेखावर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. पण राहुल गांधी यांच्या समर्थकांना ते मान्य नाही.
हे ही वाचा:
“नवा युग, नवा कर्णधार, नवे स्वप्न!”
आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांसाठी ठरतोय वरदान
फडणवीसांनी राहुल गांधींना ‘आरसा’ दाखवला!
तेलंगणात मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला मिळाली संधी ?
असे असेल तर मग राहुल गांधी यांनी असा लेख न लिहिता आपले म्हणणे थेट निवडणूकक आयोगाला पत्र लिहून कळवायला हवे होते. मात्र त्यांनी आपल्या प्रश्नांची जाहीर चर्चा व्हावी या उद्देशाने लेख लिहिण्याचा उपद्व्याप केला.
राहुल गांधी यांचे प्रश्न आहेत ते म्हणजे हे मतदानच बोगस होते, मतदारांची संख्या अशी कशी वाढली, निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यातच घोळ आहे. शेवटच्या तासात मतदारांची संख्या वाढण्याचे कारण काय. खरे तर राहुल गांधी यांचे हे प्रश्न जुनेच आहेत. कारण आज ती विधानसभेची निवडणूक होऊन सात महिने लोटले. मग आज राहुल गांधी यांना अचानक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक मॅचफिक्सिंग असल्याचे का वाटते ? कारण त्यांना याचा संबंध बिहारच्या निवडणुकीशी जोडायचा आहे. बिहारच्या निवडणुकीतही असेच काहीतरी होणार असा अंदाज राहुल गांधी यांनी आधीच बांधला आहे. त्यातून बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नाही, यावरच खरेतर शिक्कामोर्तब होत आहे. कारण त्याचे खापर कुणावर तरी फोडता आले पाहिजे म्हणून राहुल गांधी यांनी ही तयारी केलेली असावी.
फडणवीस म्हणतात की, ज्यांना जनतेने नाकारले आहे, ते महाराष्ट्रातील निवडणूक नाकारत आहेत. त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. काँग्रेस विविध राज्यात जिंकलेली आहे, मग तिथे कोणता घोळ का नाही? जिथे काँग्रेस जिंकते, तिथे ईव्हीएम, निवडणूक आयोग यावर आक्षेप नसतो. पण भाजपाने विजय मिळविला की, सगळी यंत्रणाच सदोष असते.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीत हाच निवडणूक आयोग होता, तीच यंत्रणा होती. तेव्हा काँग्रेसने दमदार यश मिळविले. भाजपाची घसरण झाली पण तेव्हा ईव्हीएम किंवा निवडणूक आयोग यावर कोणताही आक्षेप घेतला गेला नाही. किंबहुना, जनतेच्या पाठिंब्यामुळे ते यश साकारल्याची भूमिका काँग्रेसची होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे हे लेखातील दावे फोल आहेत. ते मुळातच केवळ आपल्या स्वार्थापोटी करण्यात आले आहेत. त्यात काही तथ्यही नाही. कारण विधानसभा निवडणुकीत घोळ झाला, याचा कोणताही पुरावा राहुल गांधी सादर करत नाहीत.
मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीनंतर अचानक कशी वाढली असा राहुल गांधी यांचा सवाल आहे, पण हे असे याआधीच्या निवडणुकातही घडलेले आहे, याचा सोयीस्कर विसर पडलेला आहे. अखेरच्या एका तासात ७६ लाख मतदार कसे वाढले असाही प्रश्न राहुल गांधी यांच्या मनात बऱ्याच काळापासून आहे. पण प्रत्येक निवडणुकीत असे अखेरच्या तासात मतदान होत असते. हे काही जगातील सातवे आश्चर्य नाही, याचे भानही राहुल गांधी यांना नाही.
बोगस मतदान झाल्याचाही त्यांचा दावा आहे. पण प्रत्येक मतदार केंद्रावर सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असतात, शिवाय, ज्याच्याकडे योग्य दाखले आहेत, त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. यावरून तिथे बोगस मतदान होण्याची शक्यता नाही.
त्यामुळे राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली चिंता ही केवळ एक स्टंट आहे, त्या पलिकडे काहीही नाही. त्यांना कर्नाटक, तेलंगणा या राज्यात निवडणूक आयोगाने का गोंधळ घातला नाही, असे विचारावेसे वाटत नाही.
