स्पेशल प्रोटेक्शन युनिट मधील पोलीस हवालदाराच्या २१ वर्षीय मुलाने वडिलांची सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२४ जानेवारी) दुपारी प्रभादेवी येथील म्हाडा कॉलनी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे वडील स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते व त्यांची ड्युटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडे होती अशी माहिती समोर आली आहे.
हर्ष संतोष म्हस्के (२१) असे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. हर्ष हा मुंबईतील स्पेशल प्रोटेक्शन युनिट ( विशेष बंदोबस्त शाखा) मध्ये पोलीस हवालदार असणारे संतोष म्हस्के यांचा मुलगा होता. प्रभादेवी येथील म्हाडा कॉलनी २२ वा मजला खोली क्रमांक २२०३ मधील टॉयलेट मध्ये ही घटना घडली. हर्ष हा शिक्षण घेत होता अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडे बंदोबस्ताला होते अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री ड्युटी संपल्यावर संतोष म्हस्के हे घरी आले व त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर घरातील कपाटात ठेवून काही कामानिमित्त रात्री गावी गेले होते. घरी त्यांची पत्नी आणि मुलगा हर्ष हे दोघेच होते.
शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास म्हस्के यांच्या राहत्या घरातील बाथरूम मधून गोळी झाडल्याचा आवाज येताच संतोष म्हस्के यांची पत्नीने बाथरूम उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले.
हे ही वाचा :
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार!
गुजरातमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
संजय राऊत विदुषक, उद्धव ठाकरेंना रसातळाला नेण्याचे काम केलं!
काही वेळातच ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बाथरूमचे दार उघडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हर्षला तात्काळ केईएम रुग्णालय येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष याने वडिलांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर कपाटातुन काढले, त्यानंतर तो बाथरूम मध्ये गेला आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, पोलिसांना घटनास्थळी कुठलेही सुसाईड नोट आढळून आलेले नसून या घटनेची माहिती गावी गेलेले संतोष म्हस्के यांना देण्यात आलेली आहे, गावाहून आल्यानंतर संतोष म्हस्के याचा जबाब नोंदविण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.