मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांना लोटांगण घालून पाहीले, भेटून त्यांना गूळ लावण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नसावा. मनासारखे डील झाले नसावे. बहुधा फडणवीसांनी गालातल्या गालात हसत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि चहा पाजून रवाना केले. यापेक्षा काही वेगळे झाले असण्याची शक्यता नाही. तीच तडफड, फडफड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उर्फ टोमणेबाई यांच्या भाषणातून काल शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी मुखातून बाहेर पडली. ज्यांचे चड्डी बनियान सुद्धा स्वकष्टाचे नाहीत, त्यांनी संघावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कडेलोट झाल्याशिवाय धडा घ्यायचा नाही, अशी प्रतिज्ञाच बहुधा ठाकरेंनी घेतलेली आहे.
विधानसभा निवडणुकीत फुगा फुटल्यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सपशेल लोटांगण घातल्याचे चित्र दिसत होते. आदित्य ठाकरे यांनीही एका महिन्यात तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची घरवापसी होणार अशी जाहीर चर्चा सुरू असताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील भाजपाच्या महाविजय अधिवेशनात ठाकरे-पवारांना वाईट हाणले. त्यामुळेच बहुधा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंनी आपली मळमळ बाहेर काढली. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न तर मविआतील मित्र पक्षांनीच पायदळी तुडवले. परंतु विधानसभा निवडणुकीत हाती आलेली करवंटी ठाकरेंच्या मनाला फारच लागलेली दिसते. आपला पराभव संघामुळे झाला,
संघाच्या कार्यकर्त्यांमुळे झाला, संघाच्या रणनीतीमुळे झाला हे त्यांना सलते आहे. स्वप्नातही त्यांना
संघाचे कार्यकर्ते आपले बोगस हिंदुत्व चव्हाट्यावर मांडताना दिसत असावेत. त्यामुळे ते या सभेत
संघावरही घसरले. ही पूर्णपणे मानसिक तोल ढळल्याची लक्षणे आहेत. संघ अशा लोकांच्या टिकेला
फार किंमत देत नाही.
तुम्हाला गरज पडेल तेव्हा संघ रक्त देऊ शकेल का, तुम्हाल शाळेत प्रवेश देऊ शकेल का? असे
काही टीपिकल प्रश्न ठाकरेंनी उपस्थितांना विचारले. असे बिनडोक प्रश्न फक्त ठाकरेंनाच पडू शकतात.
महाराष्ट्रासह देशभरात सुरु असलेल्या संघाच्या शाळा आणि रक्तपेढ्या मोजता येणार नाहीत इतक्या
आहेत. ज्यांना पैशाशिवाय कोणताच हिशोब कळत नाही, त्यांना ही माहिती असण्याचे काहीच कारण
नाही. संघाचा कार्यकर्ता स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून समाजाचे काम करतो. तुमचे तर चड्डी
आणि बनियान सुद्धा स्वकष्टाचे नाही.
मी हिंदुत्व सोडले आहे का? हा प्रश्न ठाकरे ज्याला त्याला विचारत असतात. खरे तर त्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात चित्ता कॅंपमधल्या मुस्लीमांकडून ठाकरेंनी हिंदुत्व प्रमाणित केलेले आहे. मी हिंदुत्व सोडले आहे का? हा सवाल त्यांनी चिता कॅंपमधील मुस्लीमांना विचारल्यावर, त्यांनी एक मुखाने, नाही… नाही… असे उत्तर दिले. झाले तर मग, ठाकरे हिंदुत्ववादी आहेत, हा शिक्का त्यांच्या कपाळावर चिता कॅंपमधील मुस्लिमांनी मारलेला आहे. त्यानंतरही त्यांनी तोच तोच प्रश्न प्रत्येक सभेच विचारण्याचे कारण काय? त्यांना वेगळ्या प्रमाण पत्राची गरज काय? कपाळावर मारलेल्या या शिक्क्याशी प्रामाणिक राहण्यासाठीच ठाकरे संघावर टीका करत असतात.
या संपूर्ण सभेत फडणवीसांच्या विरोधात एक शब्दही ठाकरेंनी काढला नाही त्याचे कारण काय? कालच्या सभेत ठाकरे इतके पिसाटलेले का होते, याचा संबंध फक्त अमित शाह यांनी शिर्डीत केलेल्या टीकेशी नसून काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीशीही आहे. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता सीबीआयची नव्याने एण्ट्री झालेली आहे. ऍड.नीलेश ओझा, राशिदखान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. त्या सुनावणीला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती. या याचिकेची प्रतही त्यांना न्यायालयाकडून मिळवली आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये गोराक्षकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!
पतंजली फूड्सला लाल मिरची पावडरची बॅच मागे घेण्याचे आदेश
वक्फ दुरुस्ती विधेयक बैठकीत घातला गोंधळ, विरोधी पक्षातील १० खासदार निलंबित
माध्यमांना हाताशी धरून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने क्लीनचिट दिल्याच्या कंड्या ठाकरेंच्या समर्थकांनी उठवल्या होत्या. मुळात दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे कधी नव्हतेच. त्यांच्याकडे सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी होती. जी न्यायालयाच्या आदेशाने बिहार पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. सुशांतप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीनचिट दिल्याची बातमी बिनबुडाची आहे, असा खुलासा सीबीआयने पत्रकार परीषद घेऊन केला आहे. आता राशिद खान यांच्या जनहित याचिकेची प्रत सीबीआयने न्यायालयाकडून मागणे याचा अर्थ सीबीआयने
नव्याने या प्रकरणात लक्ष घातले आहे.
राजकारणात सातत्याने विजय मिळवण्याचा कोणताही फॉर्म्युला नाही. कोणत्याही पक्षाकडे नाही. पराभवातून धडा घेत चमकदार विजयाकडे झेप घेणे काहींना जमते. ठाकरेंसारखे नेते कायम स्वत:च्या डोळ्यातील मुसळाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधत असतात. मी पुन्हा येईन अशी डरकाळी फोडण्याची ताकद त्यांच्यात नसते कारण, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी नसते. मग प्रत्येक सभेत भावनिक साद घालून आणि उसनी आक्रमकता दाखवून समर्थकांना गंडवण्याचा कार्यक्रम करावा लागतो. ठाकरे बराच काळ हेच करतायत. काल त्यांची जी फडफड सुरू होती, त्यात कोसळलेल्या राजकारणासोबत न्यायालयीन घडामोडींचाही समावेश आहे. मविआत दाखल होताना त्यांनी अंगभर फासलेला हिरवा शेंदूर अजून गडद झाल्याचे संकेत कालच्या सभेतून मिळालेले आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)