ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कोसळलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी इमारतीचा मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असतानाही आवश्यक सुरक्षेची उपाययोजना न करता दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोहिनूर इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. अशा परिस्थितीतही इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले. या निष्काळजीपणामुळेच इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम करणारा कंत्राटदार अशोक यालाही आरोपी करण्यात आले आहे.
या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२५ (अ) (ब) तसेच एमआरटीपी कायद्याच्या कलम ५२ व ५३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त (अनधिकृत बांधकाम विभाग) फैजल तातली यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर पोलिसांनी विविध कागदपत्रे ताब्यात घेतली असून, दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिसरातील इतर धोकादायक इमारतींचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जैश कनेक्शनप्रकरणी अर्पिता सरकारला झारखंडमधून अटक
दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत ‘नो-ड्रोन झोन’
पप्पू यादवना संसद परिसरातील ‘नाटक’ भोवले
पीओकेतील हिंसाचारावर ब्रिटनमध्येही संताप; तातडीने हस्तक्षेप करा!
ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनीही इमारतीची अवस्था दुरुस्तीपलीकडे गेली होती, असे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. इमारत रिकामी का करण्यात आली नाही, तसेच तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याचाही तपास केला जात आहे. दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.







