जेवण आणण्याच्या वादातून एकाने जीव गमावल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री झालेल्या या घटनेत ४३ वर्षीय जावेद अहमद आशिकअली खान याचा चार रूम पार्टनर यांनी मिळून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना मंगळवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जावेद हा कुर्ला पश्चिमेतील जरीमरी परिसरातील एकता सोसायटीत राहत होता. त्याच सोबत मोहम्मद सहबाज सज्जाद हुसेन खान (२१), जमाल हुसेन मोहम्मद हुसेन खान (४२), सज्जाद हुसेन मोहम्मद हुसेन खान (४२) आणि मोहम्मद आरिफ मोहम्मद हुसेन खान (३२) हे चौघे राहत होते.
सोमवारी रात्री सुमारास आठ वाजता या चौघांनी जावेदला हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेऊन यायला सांगितले. मात्र, “मी जेवणार नाही, तुम्हीच घेऊन या,” असे म्हणत जावेदने नकार दिल्याने वाद वाढला. संतापलेल्या चौघांनी मिळून जावेदवर लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर अमली पदार्थ, परकीय चलन जप्त
‘लिव्ह इन’ जोडप्याची आत्महत्या; चौथ्या मजल्यावरून उडी मारली
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द
“भारतीय राजकारणात घराणेशाहीची जागा गुणवत्तेने घेण्याची वेळ आलीये!”
गंभीर जखमी अवस्थेत जावेदने आपल्या नातेवाईक अब्दुल कादिर खान यांना फोन करून सर्व हकिकत सांगितली. अब्दुल कादिर लगेच घटनास्थळी पोहोचले आणि चौघांना जाब विचारला असता त्यांनी त्यांनाही मारण्याची धमकी दिली.
यानंतर अब्दुल कादिर यांनी जावेदला तात्काळ कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. साकिनाका पोलिसांनी चारही आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवला असून चौघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.







