कांदिवलीतील एका ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या गोदामातून १.२८ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांपैकी दोघांना चारकोप पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून अटक केली असून, त्यांच्याकडून ४३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
तक्रारदार अशोक अमृतलाल वया (वय ६३) यांची कांदिवली औद्योगिक वसाहतीत ‘श्रीजी मॅन्युफॅक्चरर्स’ नावाची कंपनी आहे. १४ मे रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास कंपनीतील सुरक्षारक्षक मोहम्मद शाफिर, विकास आणि शाहबाज गुज्जर यांनी मिळून चोरी केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक
बंगालमध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी इस्कॉन मंदिरात केली गौपूजा
व्हिएतनाम विमानतळावर भारतीय पर्यटकांचा गरबा
नीट फेरपरीक्षेवर पंतप्रधान कार्यालय ठेवणार नजर
घटना घडली त्या रात्री, आरोपी मोहम्मद शाफिर याने मालकाला व्हॉट्सॲप मेसेज पाठवून पगार न मिळाल्याचे कारण देत नोकरी सोडत असल्याचे कळवले. त्यानंतर तिन्ही सुरक्षारक्षकांचे फोन बंद झाले. कंपनी मॅनेजरने पाहणी केली असता, सोन्याच्या बांगड्यांचे बॉक्स गायब असल्याचे दिसून आले. सुरुवातीला ५.२८ कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, मात्र तपासणीनंतर १.२८ कोटी रुपयांच्या ८६४ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे तिन्ही आरोपी जम्मू-काश्मीरला पळून गेल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी पूंछ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या संवेदनशील भागात धाड टाकून मोहम्मद शाफिर आणि वकार अहमद उर्फ बिट्टू या दोघांना अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चोरी केलेले सोने आपल्या पत्नी आणि आईच्या मदतीने एका डोंगरावर पुरून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ४९ सोन्याच्या बांगड्या (४३३ ग्रॅम) जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.







