कोलकाता येथील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लॉ कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाला शनिवारी (२८ जून) अटक करण्यात आली. यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) विद्यार्थी नेत्यासह तीन आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती.
ही भयानक घटना १५ जून रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये घडली. पीडितेला अनेक तास गार्ड रूममध्ये ओलीस ठेवण्यात आले आणि तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र, शुक्रवारी (२७ जून) हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर शहरात संतापाची लाट पसरली आणि पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या फौजदारी वकील असलेला मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने तिच्यावर गार्ड रूममध्ये बलात्कार केला, तर महाविद्यालयाचे दोन विद्यमान विद्यार्थी बाहेर पहारा देत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाविद्यालयाचे मुख्य गेट बंद होते आणि सुरक्षा रक्षकाला जाणीवपूर्वक खोलीबाहेर बसवले गेले, ज्यामुळे आरोपी सहजपणे आत गुन्हा करू शकले.
या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये प्रमुख नाव मोनोजित मिश्रा आहे, जो एकेकाळी कॉलेजमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) युवा शाखेचे अध्यक्ष होता आणि सध्या अलीपूर कोर्टात वकील म्हणून काम करत आहे. तर दुसरा झैब अहमद आणि तिसरा प्रमित मुखर्जी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आता कॉलेज सुरक्षा रक्षकाला देखील अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
जेएनपीटी बंदरावर पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर जप्त!
भगवान जगन्नाथ निघाले त्यांच्या मावशीच्या घरी!
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाच्या अटकेवरून हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुनियोजित होता याची पुष्टी होते.
या लज्जास्पद घटनेमुळे राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. निषेध आणि राजकीय प्रतिक्रियांदरम्यान, पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी तीव्र झाली आहे. भाजपाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
