अलिकडे वरच्या वर आजारी असलेल्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना इस्त्रायल इराण युद्धाच्या काळात अचानक कंठ फुटला होता. एका इंग्रजी दैनिकात त्यांनी लेख खरडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना परराष्ट्र नीतीवर धडे देण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र धोरण कशाशी खातात, हे मोदींना ठाऊक नाही. हे शहाणपण फक्त काँग्रेस नेत्यांकडे होते असा त्यांचा सूर होता. हे युद्ध तुर्तास थांबले असताना त्यांना आपले शब्द गिळावे लागतील असे चित्र निर्माण झाले आहे. इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी भारताचा जय जयकार केला आहे. जिथे संवाद चालतो संवाद, जिथे लाथ घालण्याची गरज आहे, तिथे लाथ हे गेल्या काही वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य ठरले आहे. राष्ट्र प्रथम हे धोरण जारी ठेवत मोदींनी हा चमत्कार घडवलाय हे विशेष.
२०१४ पासून देशाची सूत्रं मोदींकडे आहेत. सुरूवातीपासून काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे कुत्सितपणे पाहाते आहे. हा चहावाला काय करणार, अशा प्रकारचे उद्गार काढून अनेकदा देशाच्या पंतप्रधानांचा जाहीर अपमान करण्याचा प्रकार काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केला. आपल्याला परराष्ट्र धोरणातले सगळे काही कळते हा काँग्रेसचा दंभ किती पोकळ आहे, याचा प्रत्यय सोनिय गांधी यांच्या विधानाच्या निमित्ताने पुन्हा आला असून त्यासाठी भाजपा नेत्यांना कष्ट घ्यावे लागले नाहीत. ते काम इराणनेच केलेले आहे.
गाझा आणि इराणवर एकतर्फी हल्ले होत असताना नवी दिल्लीने शांत राहाणे हा आपल्या राजकीय मूल्य आणि परंपरेचा त्याग करण्यासारखे आहे. इराण हा भारताचा मित्र असून भारताने इराणच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले होते. मुळाच सोनिया गांधी या काही उच्चशिक्षित नाहीत, त्यांना या क्षेत्रातील काही अनुभव नाही. तरुणपणी त्या लंडनच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये काम करत होत्या, तेवढाच त्यांचा अनुभव आहे.
यूपीएच्या कार्यकाळात पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह असले तरी प्रत्यक्षात सत्ता सोनिया गांधी यांचीच होती. त्या काळात चीनी कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसने करार केला होता. २००८ मध्ये झालेल्या या करारानंतर देशात चीनी मालाचा पूर आला, देशी कुटीर उद्योग पार बुडीत गेले. चीन-पाकिस्तानची दंडेली सुरू होती. भारत कडी निंदा करत होता. हेच भारताचे परराष्ट्र धोरण होते.
इस्त्रायल इराणचा संघर्ष सुरू असताना इराणचे एक वरिष्ठ मुत्सद्दी मोहम्मद होसैनी म्हणाले होते, भारत हा ग्लोबल साऊथ गटातील देशांचा नेता आहे, इस्त्रायलने इराणवर केलेले आक्रमण हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्यामुळे भारताने इस्त्रायलचा निषेध करावा, असे विधान केले होते. भारत तरीही शांत राहिला. ज्या दिवशी सोनिया गांधी यांनी इस्त्रायल-इराण संघर्षाबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्रात लेख लिहीला होता, त्याच दिवशी होसैनी यांचे हे विधान आले होते हे विशेष. भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
युद्धाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मोसूद पजशिकीयान यांना फोन केला, त्यांच्यासोबत सुमारे पाऊण तास चर्चा केली. एक युद्धरत देशाचा राष्ट्रपती मोदींसोबत पाऊण तास चर्चा करतो ही सामान्य बाब नाही. इस्त्रायल इराणमध्ये युद्ध बंदी झाल्यानंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा भारतातील दूतावात सोशल मीडियावर भारताने दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद देताना जय इराण- जय हिंद अशी घोषणा देतो.
दुसऱ्या बाजूला काल इस्त्रायलच्या विरोधी पक्षाच्यातील नेत्या, येश अतीद पक्षाच्या सदस्या, इस्त्रायली संसद नेसेटच्या सदस्या शेली मेरॉन यांनी भारतावर स्तुती सुमने उधळली आहेत. भारतावर माझे प्रेम आहे. मला भारताच्या लोकांबाबत माहिती आहे. तिथल्या संस्कृतीला मी मानते. मी भारतात राहिले आहे, तिथे काम केलेले आहे. इस्त्रायल – इराण संघर्षात भारताने मध्यस्थी केली, असती तर बरे झाले असते. इस्त्रायलचे समर्थन केल्याबद्दल भारतीयांचे धन्यवाद.
त्या असेही म्हणाल्या की, जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी इस्त्रायल-इराण संघर्षाबाबत पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. याबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
इस्त्रायल इराणमध्ये १३ दिवस युद्ध चालले. दोन्ही देशांनी एकमेकांचे प्रचंड नुकसान केले. भारताने या युद्धात ना कोणाला पाठिंबा दिला, ना कोणाच्या विरोधात विधान केले. तरीही भारताचे दोन्ही बाजूंनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.
सुरूवातीपासून जगाची विभागणी दोन भागात झालेली आहे. विकसनशील देशांचे नेतृत्व अमेरिका करतो, यात युरोपातील देश येतात. याला ग्लोबल नॉर्थ म्हटले जाते. इस्त्रायलचाही यात समावेश आहे. दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांना ग्लोबल साऊथ म्हटले जाते, यात आशिया, आफ्रिकेतील देश येतात. भारत या ग्लोबल साऊथचा नेता आहे, असे इराणचा एक वरीष्ठ मुत्सद्दी म्हणतो. इराण-इस्त्रायल हे दोन्ही देश भारताचा जय जयकार करतात. आणि या परराष्ट्र नीतीवर शरसंधान करण्याचे काम काँग्रेसचे नेते करतात.
हे ही वाचा:
कोलकात्यात विद्यार्थीनीवरील बलात्कारात तृणमूल नेता!
कर्नाटकातील चामराजनगरमध्ये एकाच दिवसात ५ वाघांचा मृत्यू!
मनू भाकर घडवणारा महान मार्गदर्शक!
भारत-पाकिस्तान सामन्याशी तुलनाच होऊ शकत नाही!
ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन रायझिंग लायनची तुलना करा. अनेक साम्य स्थळे तुम्हाला आढळतील. चार दिवसांच्या युद्धानंतर पाकिस्तानने हात जोडत युद्ध थांबवण्याची विनंती केली. भारताने हे मान्य केले. तरीही काँग्रेसच्या नेत्यांनी सरेंडर मोदी असा प्रचार चालवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भारत-पाक संघर्षाच्या काळात केले, तेच इस्त्रायल इराण युद्धाच्या काळात केले. दोन देशात मध्यस्थी केल्याचा, युद्धबंदी घडवल्याचा दावा केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पावलावर पाऊल टाकत आय़तुल्ला खोमेनी यांनी या युद्धात इराण विजयी झाल्याचा दावा केला. आमचा अणु कार्यक्रम जारी राहील, असे स्पष्टपणे सांगितले. इराणी जनतेने रस्त्यावर विजयी जल्लोष केला. तरीही इस्त्रालयच्या एकाही पक्षाने, वा नेत्याने राहुल गांधी यांच्यासारखे चाळे केले नाहीत. बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर सरेंडरचे आरोप केले नाहीत. शेली मॅरोन सारख्या नेत्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन करताना दिसतायत.
इस्त्रायल इराण युद्धाच्या काळात आम्ही किती शहाणे असा आव आणत सोनिया गांधी यांनी मोदींवर शरसंधान केले होते. भारताचे परराष्ट्र धोरण किती पोकळ आहे, आमच्या वेळी सगळे कसे आलबेल होते, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु युद्धबंदी इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी या प्रयत्नांचे अग्नसंस्कार करून टाकले.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला गेलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका चालणार नाही, असे चीनला सुनावले. एससीओच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यावर सही करायला राजनाथ सिंह यांनी नकार दिला, कारण एक तर त्यामध्ये बलोचिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा उल्लेख होता आणि दुसऱ्या बाजूला पहेलगामचा उल्लेख टाळण्यात आला होता. चीनला आपण चीनमध्ये दुसरी थप्पड मारली. रशियात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष दूत म्हणून गेलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रशियाला दणका दिला. रशियाने दहशतवाद विरोधी परिषद घेण्याचा घाट घातला होता. त्यात चीन, रशिया, इराण, तुर्कीये आणि भारतासह पाकिस्तानचाही समावेश होता. थरूर यांनी याप्रकरणी रशियन लिबरल डेमोक्रॅटीक पार्टीचे अध्यक्ष लिओनिड स्लट्स्कि यांना सुनावले. रशियन नेत्यांचे इंग्रजी वाईट असते म्हणून अस्खलित फ्रेंच भाषेत थरूर यांनी स्लटस्की यांची खरडपट्टी काढली. असा एक देश जो दहशतवाद्यांना आश्रय देतो, त्यांना हत्यारे, पैसा पुरवतो, त्या देशात दहशतवाद्यांची हेड क्वार्टर आहेत. हे दहशतवादी माझ्या देशात पाठवले जातात. हे आम्ही नजरेआड करू शकत नाही. रशिया हा भारताचा मित्र देश आहे. वेळप्रसंगी आगळीक करणाऱ्या रशियासारख्या शक्तिशाली मित्राचेही कान टोचण्याचे सामर्थ्य भारतात आहे, हे या निमित्ताने भारताने दाखवून दिले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
