केंद्रीय एजन्सी डीआरआयने ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनरमध्ये सुमारे १,११५ मेट्रिक टन माल होता, ज्याची बाजार किंमत सुमारे ९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. डीआरआयने या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील केली आहे, तर उर्वरित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट अप्रत्यक्ष मार्गाने येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. यापूर्वी अशा मालावर २०० टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत होता. मात्र, ही बंदी झुगारून काही आयातदार दुबईमार्गे पाकिस्तानातून माल आणत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याचे मूळ ‘यूएई’ असे भासवले जात होते. पण यावेळी त्यांचा डाव फसला. हा माल पकडण्यात आला.
या प्रकरणात DRI च्या तपासात असे स्पष्ट झाले की, पकडलेला माल पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईतील जाबेल अली पोर्टवर नेण्यात आला. तेथून दुसऱ्या जहाजांमधून आणि दुसऱ्या कंटेनर सेटमधून भारतात पाठवण्यात आला. ज्या कंटेनरवर यूएई इथून हा माल आला असल्याचे दाखवले होते. प्रत्यक्षात तो माल पाकिस्तानातून आलेला होता. या व्यवहारांमध्ये पाकिस्तानी आणि यूएई नागरिकांचा समावेश असून, बनावट शिपिंग डॉक्युमेंट्स तयार करून मूळ देश लपवण्याचा प्रयत्न झाला आहे.
हे ही वाचा :
भगवान जगन्नाथ निघाले त्यांच्या मावशीच्या घरी!
आदित्य ठाकरेंना हिंदी चालेल, मग आंदोलन कशासाठी ?
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
जप्त केलेल्या कंटेनरमध्ये सुका खजूर आढळून आला. पाकिस्तानी खजूरांवर युएई असे लेबल लावण्यात आले होते. तपासात हे खजूर पाकिस्तानी असल्याचे समोर आले. पाकिस्तानी कंपन्या आणि भारतीय नागरिकांमध्ये पैशाचे व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पथकाकडून पुढील तपास आणि कारवाई सुरु आहे.
